देवगड : बापर्डे खैराटवाडी येथील तीव्र उताराच्या रस्त्यावर दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पडेल नरगोलवाडी येथील रमेश सिताराम बाणे (वय ५२) यांचे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला होता. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेल नरगोलवाडी येथील रमेश बाणे हे गुरुवारी दुपारी आपल्या ताब्यातील बजाज प्लाटीना (एमएच ०७, जे ८८५८) या दुचाकीने पत्नी रश्मी यांच्यासमवेत बापर्डे येथे जात होते. बापर्डे खैराटवाडी येथील तीव्र उताराच्या वळणावर त्यांची दुचाकी आली असता रमेश बाणे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते पत्नीसमवेत रस्त्यावर कोसळले.
यावेळी रमेश बाणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर त्यांची पत्नीही जखमी झाली. दोघांनाही तात्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सायंकाळी रमेश बाणे यांचे निधन झाले. या घटनेची फिर्याद राजीव रमेश बाणे यांनी (वय २५, रा. पडेल नरगोलवाडी) यांनी देवगड पोलिसांत दिली. देवगडचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, हवालदार आशिष कदम यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत. रमेश बाणे हे शेतकरी होते. शेती व छोट्या बागायतीवरच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रमेश बाणे यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे.