सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला एका कर्ज प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयाने त्याला ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही कारवाई झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास सिंधुदुर्गनगरी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. याबाबतची फिर्याद अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांनी दिली आहे.
पंकज शेळके (३२, सध्या रा. जय मल्हार सोसायटी, कुडाळ, मूळ रा. पलूस कॉलनी, ता. पलूस, जि. सांगली) याने आपले लोकसेवक पदाचा गैरवापर करून तक्रारदार स्वप्नील गजानन ठाकूर यांच्याकडून महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मंजूर कर्जाच्या ३५ टक्के अनुदान रक्कम मंजूर करून देण्यासाठी २६ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीनंतर २२ हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगेहाथ सापडला. या कारवाईत ५०० रुपयांच्या ४४ नोटा असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. श्री. शेळके याला १ जानेवारी रोजी सकाळी अटक करण्यात आली. पुढील तपास अॅन्टी करप्शन ब्युरोमार्फत सुरू आहे.