कणकवली ः सिंधुदुर्गातील 70 ग्रामपंचायतींची जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुदत संपली होती. या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेे. या सोबतच ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रशासकीय अडचणींमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यशासनाला आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे राज्य शासनाचे अधिकार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 70 ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करीत असल्याचे आदेश सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे पंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे या कालावधीसाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्याचेही आदेशात म्हटले आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील अशा मुदत संपणाऱ्या विद्यमान सरपंच तसेच उपसरपंच व सदस्यांना हे आदेश बजावावेत. तसेच विद्यमान सरपंच यांनी प्रशासक कार्यभार स्वीकारल्याबाबत तसेच विद्यमान उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केल्याबाबत खातरजमा करून बीडीओ यांनी तसा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करावा असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेशाद्वारे सूचित केले आहे.
कुठे असणार सरपंच प्रशासक...
कणकवली तालुका- भिरवंडे, गांधीनगर व तोंडवली. सावंतवाडी तालुका-इन्सुली, मळगांव, आरोंदा, तळवडे, कोलगाव, डिंगणे, चौकुळ, मळेवाड, आंबोली, दांडेली, आरोस. मालवण तालुका- आडवली-मालडी, कुणकवळे, गोळवण- कुमामे, चिंदर, खरारे पेंडूर, मसदे-चुनवरे. कुडाळ तालुका- वाडोस, आकेरी, गोठोस, पोखरण- कुसबे, माड्याचीवाडी, गोवेरी, कुपवडे, वसोली, गिरगाव- कुसगांव. वैभववाडी तालुका- आर्चिणे, नाधवडे, एडगांव- वायंबोशी, सोनाळी, कुंभवडे, मांगवली, भुईबावडा, ऐनारी, वेंगसर, खांबाळे, सांगुळवाडी, कोकीसरे, लोरे नं. 2. देवगड तालुका- मुणगे, नाडण, मोंड, धालवली, शिरगांव, वाडा, वरेरी, पाळेकरवाडी, पाटथर, तळवडे, टेंबवली, कुणकेश्वर, इळये, मोंडपार, पुरळ, कातवण, लिंगडाळ, मुटाट, मिठबांव, तांबळडेग, कोर्ले, रहाटेश्वर, गढीताम्हाणे, कुडासे. दोडामार्ग तालुका- तेरवण-मेढे, आयनोडे व हेवाळे. वेंगुर्ला तालुका- आरवली व सागरतीर्थ.