ओरोस : पुढारी वृत्तसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६ योजनेत पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यातील ४२० गावांमधील विकास संस्था व जिल्हा बँकेकडील २७५७, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकेकडील ९१७ अशा एकूण ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची यादी गावनिहाय प्रसिद्ध झाली आहे.
पात्र शेतकऱ्यांची यादी ही संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालय, सिंधुदुर्ग बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय व तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात उपलब्ध आहेत.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी क्रमांक अनिवार्य असून ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी नसेल त्यांनी तत्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी यादीमधील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र, महा ई-सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी व कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबूक सोबत घेऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ही जिल्ह्यामधील आपले सरकार केंद्र, महा ई-सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांमध्ये करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही विनामूल्य असून कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी कोणतीही रक्कम अदा करू नये. सर्व पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.