सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : नेरूर घाडीवाडी येथे भात, गवताच्या १५ गंजी जळून खाक

backup backup

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : नेरूर घाडीवाडी येथे भाताच्या १५ गंजींना आग लागून बेचिराख झाल्या. यात सात भाताच्या उडव्यांचा समावेश आहे. या घटनेत त्याच वाडीतील सुधाकर रघुनाथ घाडी व रमेश रघुनाथ घाडी यांचे सुमारे २ लाख ५८ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले. गंजीच्या बाजूलाच असलेल्या दोन आयशर या आगीपासून सुदैवाने वाचल्या. ही घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली.या आगीचे कारण समजू शकले नसून जे शेतात घाम गाळून पिकवले ते सर्वच आगीत जळून नष्ट झाल्याने या शेतकऱ्यांना मोठा दणका बसला आहे.

नेरूर – घाडीवाडी येथील सुधाकर घाडी व रमेश घाडी यांनी आपल्या या वर्षीच्या शेतीतून पिकविलेल्या भाताच्य १५ गंजी रचून ठेवल्या होता. आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या या गंजींना आग लागली. काही वेळाने आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी धावपळ करीत विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु हा म्हणता म्हणता एकाच ठिकाणी असलेल्या या गंजी आगीत काही वेळातच बेचिराख झाल्या. भात कापणीच्या वेळी पावसाचा वारंवार व्यत्यय येत होता. पिकवलेले भात नासाडी होऊ नये म्हणून घाडी कुटुंबांनी भात कापणी करून ते न झोडपता त्या भाताची सात उडवी रचून ठेवली होती. त्यांचा या आगीत जळालेल्या १५ गंजी मध्ये समावेश आहे. घटना समजतात नेरूर सरपंच भक्ती घाडी , माजी सरपंच प्रसाद पोईपकर व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. कुडाळ पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल पाटील तसेच वालावल मंडळ अधिकारी धनंजय सिंगनाथ सायंकाळीं घटनास्थळी दाखल झाले. याबाबत श्री सिंगनाथ यानी नुकसानीचा पंचनामा केला. सुधाकर घाडी व रमेश घाडी या दोघांचे मिळून २ लाख ५८ हजार पाचशे रुपयाचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली. याचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत कुडाळ पोलीस ठाण्यात नव्हती. भातासह गवताच्या गंजी जळून खाक झाल्याने या शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहासह जनावरांच्या वैरणीचा मोठा गंभीर प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आता निर्माण झाला आहे. जे शेतात घाम गाळून पिकवले ते सर्वच आगीत जळून खाक झाल्याने आता वर्षभर खायचे काय असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या गंजी वस्ती पासून काही अंतरावर असल्याने या गंजींना लागलेली आग समजेपर्यंत उशिर झाला. तोपर्यंत सर्व गंजी पुर्णतः आगीत जळून नष्ट झाल्याने आग विझवण्याची संधीच मिळाली नाही. याजवळच दोन आयशर टेम्पो उभे करून ठेवले होते. आग या आयशर टेम्पो जवळही पोहचली होती. मात्र यापुर्वीच आग विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

SCROLL FOR NEXT