देवगड: पुढारी वृत्तसेवा : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर (Kunkeshwar) महाशिवरात्री यात्रौत्सवाला बुधवारपासून (दि.२६) सुरूवात होत आहे. बुधवार (दि. २६) आणि गुरूवारी (दि. २७) दोन दिवस यात्रा होणार आहे. गुरूवारी दर्श अमावास्या महापर्वणी तीर्थस्नानाचा योग आहे. त्याचबरोबर प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्याची सांगता देखील यादिवशी होणार असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. (Mahashivratri 2025)
कुणकेश्वर भेटीला यावर्षी दहा देवस्वाऱ्या येणार असून सुमारे ३०० वर्षांनी मिठबावचा रामेश्वर तर ३९ वर्षांनी आचरा येथील श्री देव रामेश्वर देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहे. यात्रेचा कालावधी दोन दिवसांचा असल्याने यावर्षी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार आहे. कुणकेश्वर यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली असून शिवभक्तांची पाऊले कुणकेश्वर क्षेत्री वळू लागली आहेत. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नीटनेटके नियोजन केले आहे. एसटी, वीजवितरण, पोलिस, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार आदी सर्व विभागांकडून योग्य नियोजन केले आहे. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उभारली आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने थाटली आहेत. या वेळी यात्रेच्या ठिकाणी पारंपरिक शेती अवजारे विक्रीस आली आहेत. तसेच कुणकेश्वरच्या समुद्रकिनारी परिसर भेल, आईस्क्रिम, इतर हॉटेल्सनी फुलून गेलेला आहे.
वाहतुकीचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तारामुंबरी, मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांशी वाहतूक कमी प्रमाणात होईल. तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये तारामुंबरी, मिठमुंबरी पूल मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी आस्मी हॉटेलनजीक, कणकवली येथून लिंगडाळमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल शिवसागरसमोर, आचरा मिठबांव मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी एमटीडीसीसमोर वाळूवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेतील अनुचित प्रकारावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे टेहळणी पथक व देवस्थान ट्रस्टच्या स्वयंसेवकांचे पथक कार्यरत आहे. त्याचप्रमाणे क्लोज सर्किट कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.
महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीसाठी १० देवस्वाऱ्या जाणार आहेत.यामध्ये मिठबांव श्रीदेव रामेश्वर देवस्वारी ३०० वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी जाणार आहे. तर श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचरा श्री देव रामेश्वराची देवस्वारी ३९ वर्षांनी, शिरगाव श्री देवी पावणाई देवी २२ वर्षांनी व देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बा रामेश्वर देवस्वारी १२ वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी जाणार आहेत. याशिवाय श्री देव माधवगिरी माईन कणकवली, श्री गांगेश्वर नारींग्रे, श्री देव जैनलिंग रवळनाथ महालक्ष्मी पावणादेवी गांगो बिडवाडी कणकवली, श्री देव गांगेश्वर बावशी बेळणे कणकवली, श्री पावणादेवी हुंबरठ कणकवली, श्री गांगेश्वर पावणाई भावई दाभोळे या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला जाणार आहेत. यावर्षीचा १० विक्रमी देवस्वाऱ्या कुणकेश्वरमध्ये जात असल्याने तसेच यात्रा कालावधी दोन दिवसांचा असल्याने गर्दीचा उच्चांक होणार आहे.
कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २६ अधिकारी, १०३ अंमलदार, १४९ होमगार्ड असा २७८ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देवगड आगारातून २६ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली. यामध्ये देवगडमधून ११, शिरगावहून ६, नांदगांव २, पोयरे १, नारींग्रे दहिबांव १, किंजवडे डोबवाडी १, मोंडतर टेंबवली १, आरे निरोम १, तळेबाजार तळवडे बागतळवडे १, तेलीवाडी ताम्हाणेतर १ अशा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.