श्री कुणकेश्वर मंदिर छायाचित्रे - वैभव केळकर
सिंधुदुर्ग

श्री कुणकोबा... एक पुराणकालीन शिवतीर्थ!

Mahashivratri 2025 : जांभ्या दगडाने बांधलेले मजबूत आणि भव्य मंदिर

पुढारी वृत्तसेवा
शब्दांकन : सौ. स्वाती चंद्रशेखर तेली, जामसंडे

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या समुद्रकिनारी कुणकेश्वर गाव वसलेले आहे. येथील प्राचीन शिवमंदिर जगप्रसिद्ध आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. या श्री कुणकेश्वर मंदिराचा उल्लेख ‘स्कंद’ पुराणात व श्री संगमेश्वर महात्म्यातही आढळून येतो. यावरून या मंदिराची प्राचीनता लक्षात येते. श्री कुणकेश्वर मंदिर हे फार कलाकुसरीने युक्त नसले तरी जांभ्या दगडाने बांधलेले मजबूत आणि भव्य मंदिर आहे.

कुणकेश्वर मंदिराला ‘दक्षिण कोकणची काशी’ असे देखील म्हटले जाते. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिवमंदिरातून ठिकठिकाणी महाशिवरात्री साजरी केली जाते. देवगड तालुक्यातील ‘दक्षिण कोकणची काशी’ म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र म्हणजे ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर’! माघ कृष्ण त्रयोदशी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी ही यात्रा भरणार आहे.

श्री कुणकेश्वर मंदिराचा संपूर्ण परिसर नयनरम्य आहे. मंदिराला एकूण 6 दरवाजे आहेत. मंदिर परिसरामध्ये एक तलाव आहे, मध्यभागी शंकराची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. मुख्य मंदिराच्या गाभार्‍यात भव्य शिवलिंग आहे. मुख्य कुणकेश्वर मंदिराबरोबरच इथे इतर देव-देवतांची मंदिरेदेखील आहेत. या मंदिरांमध्ये श्री जोगेश्वरी देवी मंदिर, भैरव मंदिर, श्री मंडलिक मंदिर, नारायण मंदिर, गणेश मंदिराचा समावेश होतो. मुख्य मंदिरासमोर एक विशाल दीपस्तंभ आणि नंदीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवासची व्यवस्था केली आहे.

देवगडमधील श्री कुणकेश्वर मंदिर अकराव्या शतकात यादवांनी बांधलेले मंदिर आहे. सोळाव्या शतकात मुघलांच्या काळात औरंगजेबाचा पुत्र शाहआलम याने या मंदिरावर आक्रमण करून मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शाह आलमकडून झालेल्या आक्रमणानंतर करवीरकर संभाजीराजे व पंत अमात्य यांनी मंदिर दुरुस्त केल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराचे बांधकाम हे द्रविड शैलीमध्ये केल्याचे दिसून येते. अथांग पसरलेल्या समुद्र किनार्‍यावर वसल्यामुळे श्री कुणकेश्वर मंदिराची तटबंदीदेखील तेवढीच भक्कम बांधली आहे. मंदिराचा पाया ग्रेनाईट खडकाने बनविला आहे. कुणकेश्वर मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने केल्याचे स्पष्ट होते.

या मंदिराविषयी वेगवेगळ्या दंतकथा प्रचलित आहेत. मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. श्री कुणकेश्वर हे आता धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध स्थळ म्हणूनही मान्यता पावले आहे. या प्राचीन मंदिराचा स्कंद पुराणात व संगमेश्वर महात्म्यमध्ये उल्लेख आढळतो. मंदिराला लागून समुद्रकिनार्‍यावर दगडात कोरलेली शिवलिंगे आहेत. ही शिवलिंगे कुणकोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी पांडवांनी कोरली असल्याची अख्यायिका आहे. समुद्राच्या ओहोटी वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात. श्री कुणकेश्वर मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात यादव घराण्याकडून केले गेले आहे. मंदिराचे बांधकाम द्राविडीयन पद्धतीने केल्याचे दिसते. मंदिरापासून कातवण गावाकडे जाताना एक जांभ्या खडकात कोरलेली छोटी गुहा आहे. त्यात तत्कालीन कुडाळ प्रांतातील ब्राह्मण सामंत राजवंशातील स्त्री-पुरुषांचे मुखवटे आहेत. कुणकोबाच्या स्वयंभू मंदिरात महाशिवरात्री निमित्त वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. ही यात्रा कधी दोन, तर कधी तीन दिवस चालते. राज्याच्या अनेक भागातून लाखो भाविक कुणकोबाच्या दर्शनासाठी हजर होतात. याच जत्रेच्या काळात आंगणेवाडीच्या देवी भराडीची जत्रा होत असल्याने मुंबईकर तर या दोन्ही उत्सवासाठी आवर्जून उपस्थिती लावतात .

शिवरात्रीनंतर अमावस्ये दिवशी भाविक समुद्र स्नान करतात. जिल्हा भागातील काही देवस्थानांमधून देवस्वार्‍या या दिवशी पवित्र स्नानासाठी या तीर्थक्षेत्रावर आपल्या लवाजम्यानिशी येतात. यावर्षी 9 देवस्वार्‍या कुणकोबाच्या भेटीला येणार आहेत. हा समुद्र स्नानाचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो .देवत्वाची प्रचिती घ्यायची असल्यास यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहूनच हा अनुभव घ्यावा असा हा क्षण असतो.

या यात्रेचे नियोजन अत्यंत चोखपणे केले जाते. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन, महावितरण, ग्रामपंचायत तसेच गावचे मुंबई स्थित रहिवासी मंडळ यांच्याकडून हे नियोजन केले जाते. एसटी महामंडळासाठी हंगामी आगार व्यवस्था उभारली जाते. तर खाजगी वाहनांसाठी वेगळी व्यवस्था केली जाते. तारामुंबरी पुलाची सोय झाल्यामुळे देवगड कडून जाणार्‍या खाजगी वाहनांची मंदिरापासून काही अंतरावर पार्किंगची सोय केली जाते. या यात्रेमुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. युवकांच्या हाताला काम मिळते. यात्रेतील सुरक्षा दृष्टीने येथील पोलिस यंत्रणा, तटरक्षक दलाचे कर्मचारी, गस्ती नौका, अग्निशमन यंत्रणा, जीव रक्षक यासाठी स्वयंसेवक काम करत असतात. संपूर्ण जत्रेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात. अत्यंत चोखपणे या यात्रेचे नियोजन केले जाते.

मंदिर गेट पासून दर्शन रांगेची सुरुवात होते. रांगेतील भाविकांना मध्येच थकल्यासारखे वाटले तर बेंचेस व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील आहे. अशा पद्धतीने अतिशय शिस्तबद्ध रीतीने देवदर्शन पार पाडले जाते. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुखदर्शनाची व्यवस्था ही या यात्रेत केली जाते. अपंग व वयोवृद्ध भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनव्यवस्था यंदापासून केली जाणार आहे. यात्रेसाठी अनेक भागातून व्यापारी येथे उपस्थिती लावतात. यात्रेतील आकाश पाळणे, मौत का कुवा असे खास आकर्षणाचे खेळही आपल्याला दिसतात. विशेषतः खेळणी, हॉटेल्स, कपडे, लोखंडी सामान अशा नानाविध प्रकारचे व्यापारी येथे येतात. कलिंगड आणि मालवणी खाजा हे या यात्रेतील बाजाराचे खास आकर्षण आहे. मंदिराला विविध पाने व फुलांनी तसेच दिव्यांची रोषणाई करून सजवले जाते. समुद्रकिनार्‍यावर उंट स्वारी, घोडेस्वारीही अनुभवता येते. पाणीपुरी, शेवपुरी, भेळ,मक्याची भाजलेली कणसे व तत्सम पदार्थांची मनमुराद आस्वाद घेत या यात्रेचा आनंद घेता येतो. नवी- जुनी मित्रमंडळी ,नातेवाईक इथे भेटले की कमालीचा आनंद देणार्‍या या जत्रेत यायलाच हवे.

आपल्या भागात होणार्‍या या जत्रा म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन असते. ही एकत्वाची भावना मनामनात निर्माण करणार्‍या या जत्रा गेल्या शेकडो वर्षांपासून आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरल्या आहेत. डिजिटल युगात आता ऑनलाईन शॉपिंग सुरू झाले असले तरी अश्या जत्रेतून प्रत्यक्ष खरेदी करण्याचा आनंद निराळाच आहे. दरवर्षी ठराविक गोष्टी याच जत्रेत खरेदी करणारे भाविक नेमाने जत्रेला हजेरी लावतात. श्री कुणकेश्वर कडे येण्यासाठी मुंबई -गोवा हायवे वरील नांदगाव तिठ्या वरून व मालवण पासून येताना आचरा मार्गे मंदिरापर्यंत पोहोचता येते. देवगड शहरातून आता मिठमुंबरी मार्गे मंदिराच्या दारात जाता येते.

आपण आपल्या कुटुंबियांसह , आप्तेष्टांसह यावर्षी परमपवित्र श्री शिवाचे म्हणजे कुणकोबाचे दर्शन घेऊया , आपल्या सर्व ऐहिक पारलौकिक कल्याणासाठी श्रीशिवचरणी नतमस्तक होऊया !

महाशिवरात्रोत्सवाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्र असते. माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्र’ म्हणतात. या शिवरात्रीचा महिमा वर्णावा तेव्हढा थोडा आहे .या दिवशी हिंदू बंधू भगिनी उपवास करतात. शिवाची मनोभावे आराधना करून शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेऊन पिंडीवर बेलपत्र अर्पण करतात. भाविक संपूर्ण दिवस उपवास करून दुसर्‍या दिवशी उपवास सोडतात. इंग्रजी महिन्यात सांगायचे झाले तर ही महाशिवरात्र फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये असते.अग्निपुराण, शिवपुराण, पद्मपुराण या पुराणांमध्ये मध्ये महाशिवरात्रीचे महत्त्व सांगितले आहे. महाशिवरात्रि विषयी बर्‍याच आख्यायिका देशभरात सांगितल्या जातात. असे असले तरी या महाशिवरात्रीचे वेगळेच महत्त्व आहे. शिवतत्वावर अढळ श्रद्धा असणार्‍या भाविकांसाठी महाशिवरात्रीचे वेगळेच महत्त्व आहे .गृहस्थाश्रमातील लोक महाशिवरात्र या दिवशी भगवान शिव शिवशंकरांचा विवाह झाला म्हणून साजरी करतात, तर योगीजन हजार वर्षाच्या ध्यानधारणेनंतर शिवशंकर कैलास पर्वताशी एकरूप झाले आणि कैलासाचाच एक भाग बनले म्हणून शिवरात्र साजरी करतात. योगी लोक महाशिवरात्रीला स्थैर्याचा दिवस म्हणून मानतात.

शिवरात्र एक उल्लेखनीय सण असा आहे जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचा स्मरणदिवस आहे. हे शिवशंभुचे स्मरण करून आणि प्रार्थना, उपवास, नीतिमत्ता आणि सद्गुणांचे पालन करून हे व्रत पाळले जाते . शिवसाधक यावेळी रात्रभर जागरण करतात. आपल्या शरीरात शिवतत्वापासून निर्माण झालेली ऊर्जा सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात . ‘महाशिवरात्र’ हा एक असा दिवस आहे की मनुष्याची अध्यात्मिक पातळी उच्च करण्यासाठी शिवरात्री केली साधना मदत करते. आणि या काळाचा उपयोग करून घेण्यासाठी आपण हा उत्सव साजरा करतो . हे व्रत अहोरात्र चालते. ’महाशिवरात्र’म्हणजे अंधाराचा उत्सव आहे.

प्रकाश हा शाश्वत नसतो तर अंधार हा सर्वव्यापी आहे ,सर्वाधिक आहे म्हणून आपण महाशिवरात्र म्हणतो ती गडद अंधारमय रात्र असते.या दिवशी मनुष्य आपल्या मर्यादाना विसर्जित करून सृजनाच्या त्या अमर्याद स्त्रोताची अनुभूती घेऊ शकतो. महाशिवरात्र आणि जागरण यालाही महत्व आहे.

भगवान शिवशंकर एका बाजूने संहारक म्हणून जाणले जातात तर दुसर्‍या बाजूने ते सर्वाधिक करुणामय देखील आहेत. योगिक पुराणांमध्ये ते अनेक ठिकाणी करुणामय रुपात दिसतात. या सर्व अनुषंगाने आपण मनुष्यप्राणी म्हणून कमीत कमी या रात्रीला एखादा क्षण तरी या अमर्यादशक्तीची अनुभूती घ्यायला हवी. ही रात्र आणि जागरण म्हणजे झोपेतून जागणे नव्हे, चेतना आणि जागृतीने संपन्न असलेली अशी एक रात्र म्हणजे शिवरात्र होय.

महाशिवरात्रीला शिवलिंगाला पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध, तूप, दही, शेण आणि गोमूत्र लावून अभिषेक करतात. त्यानंतर धोत्रा व बिल्वपत्रांनी पूजा करतात. नारळ, बिल्वपत्र, पांढरी फुले शिवाला फार प्रिय आहेत. महाशिवरात्री दिवशी भारतभर विविध तीर्थक्षेत्रे तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगाच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT