कणकवली ः आशियेमठ येथील श्री दत्तक्षेत्र या 567 वर्षांच्या पुरातन दत्त मंदिरात 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत सकलजनकल्याणार्थ अतिरुद्र स्वाहाकार महाअनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. नेपाळच्या ग्रामीण भागातून संकलित केलेले 11 हजार रुद्राक्ष आणले जाणार असून या रुद्राक्षांवर 150 ब्राह्मणांकडून रुद्र पठणाने व अखंड अभिषेकाने रुद्रस्वाहाकार विधी केला जाणार आहे. यासाठी बारा ज्योर्तिलिंग ठिकाणाची माती व पाणी आणले असून या मातीची शिवपिंडी तयार करून भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. या सोहळ्यासाठी शृंगेरी पिठाचे शंकराचार्य उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरुद्र स्वाहाकार सोहळा समिती अध्यक्ष विलास खानोलकर यांनी दिली.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. खानोलकर बोलत होते. आशिये सरपंच महेश गुरव, मिलिंद खानोलकर, रवींद्र बाणे, सुनील बाणे, पांडुरंग तुकाराम बाणे, पांडुरंग बाणे, संजय बाणे उपस्थित होते. रविवार 25 जानेवारीपासून अतिरुद्र स्वाहाकार सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या दिवशी सकाळी 6 वा. नित्यपूजा, 8 वा. सूर्य उपासना, 8.30 वा. धर्मधज्वारोहन, नंदीपूजन, 9 वा. प्रार्थना, 9.30 वा. भालचंद्र महाराज संस्थान ते श्री दत्त क्षेत्र आशियेमठ अशी शोभायात्रा. यात 1 हजार भाविक सहभागी होणार आहेत. सायंकाळी 6 वा. आशिये गावातील कलाकारांचा ‘आपम महोत्सव’ होणार आहे. याचे उद्घाटन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डिचोली (गोवा)चे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित राहणार आहेत.
सोमवार 26 रोजी स. 7 ते दु.12.30 वा. मंगलाचरण, महासंकल्प, आचार्यादि, ऋत्विक वरण, महान्यासपूर्वक, अतिरुद्र जपानुष्टान प्रारंभ, गुरुचरित्र पारायण, भागवत सप्ताह, चतुर्वेद पारण, दु.12.30 वा. आरती, सायं. 4 वा. नामस्मरण, भजन, 6 वा. धुपारती, रोजापचार सेवा हे धार्मिक विधी होतील. रात्री 8 वा. संदीप मांडके यांचे कीर्तन. मंगळवार 27 ते शनिवार 31 या कालावधीत दररोज स.7 वा ते दु.12.30 वा. अतिरुद्र जपानुष्ठान, दु.12.30 वा. आरती, सायं. 4 ते 6 वा.नामस्मरण, सायं. 6 वा ते रात्री 7.75 वा. धूपारती, राजोपचार सेवा. या कालावधीत मंगळवार 27 रोजी रात्री 8 वा. महेश केळुसकर, शशिकांत तिरोडकर, गोविंद नाईक, प्राजक्ता सामंत यांचा काव्यरंग कार्यक्रम होईल. बुधवार 28 रोजी रात्री 8 वा. पालकमंत्री नीतेश राणे यांचा सत्कार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. राज्यसभेचे खा. सदानंद शेठ हे उपस्थित राहणार आहेत. रात्री 8 वा. संयुक्त दशावतार सादर होईल, असे विलास खानोलकर यांनी सांगितले.
गुरुवार 29 रोजी 8 वा. श्री लिंगेश्वर मंडळ भरणीचे बुवा विनोद चव्हाण व ब्राह्मणदेव मंडळाचे बुवा केदार कदम यांच्यात डबलबारी सामना होणार आहे. शुक्रवार 30 रोजी रात्री 8 वा. समाधान महाराज यांचे वारकरी कीर्तन. शनिवार 31 रोजी दिलीप ठाकूर, राधा जोशी, स्वप्नील गोरे यांचा स्वरंग कार्यक्रम होईल. 1 फेब्रुवारी स. 7 ते दु. 12.30 वा. अतिरुद्र जपानुष्ठान व ग्रहृयजन, वास्तूयजन रुद्रस्वाहाकार, दुपारी 12.30 वा. आरती, दु.1 वा. प्रसाद, 2.30 वा. उदय राणे यांचे भजन, सायं. 4 वा. ब्रह्मवृंदांचा सन्मान, 6 वा. राजोपचार सेवा, रात्री 8 वा. लोकरंग कार्यक्रम होईल. 2 फेब्रुवारी स. 7 ते दु.12.30 वा. रुद्रयाग, बलिदान, पूर्णाहुती, उत्तरांग विधी, दक्षिण, आशीर्वाद, दु. 12.30 वा. आरती, मंत्रपुष्प, गाऱ्हाणे, दु.1 वा. महाप्रसाद, त्यानंतर नागेश पाटील यांचा ‘स्वामीगंध’ कार्यक्रम होईल. सायं.6 वा. प. जयतीर्थ मेवुंडी यांचा ‘अभंगरंग’ कार्यक्रम होईल. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरुद्र स्वाहाकार सोहळा समितीचे अध्यक्ष विलास खानोलकर, सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.