ना. उदय सामंत म्हणाले...
आ. केसरकर पायानं मारतात ती गाठ हातानं सुटत नाही
संपर्कमंत्री म्हणून बोलायचं कोणाशी, हा प्रश्न पडतो
विरोधकांचं डिपॉझिट जप्त होतील असे उमेदवार उभे करू
सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महायुतीचा किंवा शिवसेनेचा भगवा फडकवायचाच आहे. मात्र, शिवसेनेच्या ताकदीला कमी लेखण्याचे काम कुणीही करू नये, असे ठणकावून सांगत उद्योगमंत्री तथा शिवसेना संपर्कमंत्री उदय सामंत यांनी पक्ष कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले.
सावंतवाडी गोविंद चित्र मंदिरमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. र माजी मंत्री आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे, माजी आ.राजन तेली यांच्यासह जिल्हाप्रमुख संजू परब, संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अॅड .नीता सावंत-कविटकर, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे ,बाबू कुडतरकर,अनारोजीन लोबो, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे’, त्यांच्यासारखेच नेतृत्व आ. नीलेश राणे करत आहेत. आम्ही नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला जिल्हा पाहिला आहे, तीच माणसं आज नीलेश राणेंच्या मागे उभी आहेत. आ. दीपक केसरकर इलेक्शन मोडवर आले की समोरचे शिल्लक राहत नाहीत. केसरकरांची शांतता वादळापूर्वीची आहे. आ. केसरकर पायानं मारतात ती गाठ हातानं सुटत नाही, असा टोला ना. सामंत यांनी यावेळी त्यांचा विरोधकांना लगावला.
महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे, आणि वाईट घडू नये म्हणून एकनाथ शिंदे देखील पुढाकार घेत आहेत. तथापि,महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी आपली पाहिजे.मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम असलं पाहिजे. महायुती झाल्यास मित्रपक्षाने आमचा सन्मान राखला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. संपर्कमंत्री म्हणून बोलयचं कोणाशी, हा देखील प्रश्न पडतो, कारण त्यापूर्वीच मैत्रीपूर्ण लढतीची विधाने होतात, असे ना. सामंत म्हणाले. महायुतीचा निर्णय नेते घेतील, मात्र शिवसेनेचा उमेदवार असणार अशी भूमिका घेऊन कामाला लागा, प्रचारास सुरुवात करा. हा मेळावा आदेशाचा आहे असं समजाा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सिंधुदुर्गात दोन आमदार आमचे आहेत. आम्ही जि. प. वर स्वबळावरही भगवा फडकवू शकतो. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सिंधुदुर्गची ओळख राज्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ. केसरकरांनी फक्त आम्हाला लढ म्हणावं, आम्ही तुमच्या आशीर्वादानं लढू. विरोधकांचं डिपॉझिट जप्त होतील असे उमेदवार उभे करू, असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. आ. रवींद्र चव्हाण यांचा विकास आराखडा असल्यास तो द्यावा, आम्ही त्याचे स्वागत करू, असे सांगत,“हम किसी से कम नही’ ही शिवसेनेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना आ. नीलेश राणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आक्रमक आवाहन केले आहे. ‘थांबायची वेळ गेली, हीच ती वेळ आहे, तुम्ही तयारीला लागा. गप्प बसण्याचे दिवस नाहीत’ असा मित्र पक्षाला सूचक इशारा देणारे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. ‘सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तीनही मतदारंसघात आपली ताकद आहे. त्यामुळे थांबायची वेळ गेली. हीच ती वेळ आहे, तुम्ही तयारीला लागा. सावंतवाडी, कुडाळवर डोळा आहे.आपली किंमत मैदानात दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
दीपक केसरकरांच्या स्वभावाचा परिणाम माझ्यावर झालाय. मात्र, दीपक केसरकर मैदानात उतरले तर अनेकांना पत्ते बदलावे लागतात. कुंपणावर उभं असणार्यांना कधी घ्यायचं सांगा, आपला हॉल हाऊसफुल्ल होईल.फक्त, केसरकरांनी ग्रीन सिग्नल द्यावा, समोर काही शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या निर्धाराने कामाला लागा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे. ‘माझ्या पाठिशी सर्वजण आहेत, त्यामुळे आम्हाला जिंकण्यासाठी लढायचं आहे’ असे ते म्हणाले.
ओंकार हत्तीला एका आठवड्याच्या आत जेरबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आपद्ग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महायुती झाली तर ती वेळेत झाली पाहिजे; दुसर्याला संधी मिळणार नाही याची काळजी घ्या. युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही, मात्र स्थानिक पातळीवर वेगळी विधाने येत आहेत. यासाठी आमचे मित्र सोबत आले तर सोबत लढू, अन्यथा आम्हाला त्यांच्याशिवाय लढावं लागेल, असे स्पष्ट मत आ. केसरकर यांनी त्यांनी व्यक्त केले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. तुमच्या प्रचाराला मी फिरणार आहे. बळ एकीत आहे. स्वबळावर विचार करताना अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे एकमताने उमेदवार द्या, मतभेद ठेवू नका. विजय निश्चितच होईल, असा विश्वास आ. केसरकरांनी शिवसैनिकांना दिला. आ. केसरकर यांच्या या विधानामुळे महायुतीच्या स्थानिक समीकरणांबाबत निर्माण झालेला तणाव पुन्हा समोर आला आहे.