सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून शिवापूर ग्रामस्थांसाठी आयोजित बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता वनमोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दुकानवाड, शिवापूर दशक्रोशीसाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यास जागा उपलब्ध करुन दिल्यास तातडीने तिथे स्टेशन उभारू अशी ग्वाही दिली. यावर दुकानवाड येथील व्यापारी ग्रामस्थांनी त्वरित जागा देण्याची तयारी दर्शवली.
माणगाव खोर्यातील वीज ग्राहकांची बैठक कुडाळ तालुक्यातील दुर्गम शिवापूर गावी घेण्यात आली. माणगाव खोर्यातील अनेक गावांमध्ये पंधरा पंधरा दिवस वीज गायब असल्याच्या तक्रारी वीज ग्राहक संघटनेकडे येत होत्या. याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवापूर गावच्या सरपंच सौ. शेडगे यांनी व्यथा मांडली होती. त्यावेळी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांनी बुधवार 25 जून रोजी शिवापूर येथे दुपारी ग्रामस्थांसोबत बैठक घेण्याचे कबूल केले होते. यानुसार वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय लाड व कार्यकारी अभियंता वनमोरे, उपकार्यकारी अभियंता महेश निळकंठ, सहा. अभियंता रामचंद्र शेळके आदींनी शिवापूर येथे ग्रामपंचायतमध्ये वीज ग्राहकांसोबत बैठक घेतली. यावेळी शिवापूर सरपंच सौ.सुनीता शेडगे, उपसरपंच महेंद्र राऊळ, वसोली सरपंच अजित परब, सुधीर गुंजाळ, गौरी गुंजाळ, हर्षा मेस्त्री आदी उपस्थित होते.
सरपंच सौ.सुनिता शेडगेंसह वीज ग्राहकांनी माणगाव खोर्यातील दुकानवाड, शिवापूर दशक्रोशीसाठी स्वतंत्र सबस्टेशनची मागणी केली. शिवापूर येथे येणारी मुख्य वीज वाहिनी जंगलमय भागातून येते. परिणामी या वीज वाहिनीत वारंवार बिघाड होेतो. यासाठी ही संपूर्ण वीज वाहिनी रस्त्याच्या कडेने खांब उभे करून नव्याने ओढावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.रस्त्याच्या कडेने किती खांब लागतील याचा सर्व्हे किलोमीटर प्रमाणे सहा. अभियंता रामचंद्र शेळके यांनी केला असून तसा अहवाल सादर केला आहे. त्या अहवालाप्रमाणे लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन श्री.वनमोरे यांनी दिले.
वीज वाहिन्यांवर आलेली झाडी कटिंग करावी, जुने वीज मीटर कायम ठेवावेत, नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवूू नयेत, आदी मागण्या यावेळी ग्राहकांनी केल्या. माणगाव खोरे हा भाग विस्ताराने मोठा असून संपूर्ण क्षेत्र सहा.अभियंता रामचंद्र शेळके हे सांभाळतात. परंतु माणगाव खोर्यासाठी एकच वायरमन असल्याने वीज ग्राहकांना त्रास होत आहे. त्याकरिता माणगाव खोर्यात किमान दोन वायरमनची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनीकेली. विकास माणगावकर, शांताराम कदम, गोपाळ कदम,अनिल बांग, सुरेश नाईक, धोंडी राऊळ, मोरारजी बांग, साईनाथ साळगावकर, सहदेव पाटकर, महादेव चव्हाण, राजाराम पालकर आदी वीज ग्राहक उपस्थित होते.