कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली पाहिजे, अशी भूमिका भाजपा नेते खा. नारायण राणे यांनी मांडली आहे. आम्ही सुद्धा त्यांच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहोत. महायुती होणार असेल तर आम्ही त्यात ‘मिठाचा खडा’ पडू देणार नाही. मात्र, युती झालीच नाही, तर शिंदे शिवसेना स्वतंत्र लढेल आणि जिल्ह्यात भगवा फडकवेल, अशी माहिती उद्योगमंत्री व शिंदे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी व्यक्त केली.
कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंधुदुर्गात होणाऱ्या नगरपंचायती निवडणुकांबाबत खा. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीची भूमिका मांडली होती. त्या भूमिकेचे ना. सामंत यांनी स्वागत केले.
ना. उदय सामंत म्हणाले, खा. राणे यांना राजकारणाचा प्रचंड अनुभव आहे. त्यांचा सल्ला घेऊनच आम्ही राजकीय पाऊले टाकणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आम्हाला सांगितले आहे की, खा. राणेंचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. त्यामुळे खा. राणे जे काही बोलतात, त्याला खूप महत्त्व आहे. आमचीही भूमिका समन्वयातून युती व्हावी अशी आहे. कृतीसाठी बसायचं असेल तर मी संपर्कपमंत्री म्हणून बसायला तयार आहे. काही मंडळींना संपर्क मंत्र्यांबरोबर बसायचं नसेल, त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करावी व यातून मार्ग काढावा; पण जर प्रयत्न करूनही युती झाली नाही, तर मात्र शिंदे सेना स्वतंत्र लढेल. सिंधुदुर्गात युती हवी; पण ती होणार असेल तर कुणी अडथळा आणू नये. मी स्वतः मिठाचा खडा पडू देणार नाही, असे ना. सामंत यांनी सांगितले.
शिंदे शिवसेनेत दाखल झालेले माजी आ. राजन तेली यांच्याबाबत खा. राणे यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, राजन तेली हे महायुतीत कुठेही अडसर ठरणार नाहीत. ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि महायुतीसाठी ते सदैव तयार आहेत. राजन तेली राजकारणात परिपक्व राजकारणी आहेत. त्यांचा महायुतीमध्ये कुठेही अडथळा येणार नाही, पक्षप्रवेशादरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत, महाविकास आघाडीमध्ये जायचं का? हे आम्ही वरिष्ठांना विचारू, असं राजन तेली बोलल्यामुळे ते कदाचित आरोपीच्या पिंजऱ्यात राहिले असतील, कुठेही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिंदे शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असे ना.सामंत यांनी सांगितले.
ना.सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक होऊन तिथे महायुती निश्चित झाली आहे. मात्र सिंधुदुर्गची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. रत्नागिरीत आमचा समन्वय चांगला आहे, पण सिंधुदुर्गचा ‘पॅटर्न’ वेगळा आहे. आम्ही खा. राणे यांच्या भूमिकेशी सहमत आहोत आणि युतीसाठी तयार आहोत.असे सांगितले.