सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्यांची लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घडवून आणणार असून, कार्यकर्त्यांना बळ देण्याचा निर्धार ठाकरे शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केला.
माजगाव येथील सिद्धिविनायक सभागृहात ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करण्यात आले. तसेच आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये नव्याने ऊर्जा निर्माण करण्यासाठी शिबिराचे सावंतवाडी तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक यांनी आयोजन केले होते.
श्री.दुधवडकर म्हणाले, पक्ष ज्यांना उमेदवारी देतो, ते पक्ष संघटनेकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे यापुढे पदाधिकार्यांना बळ देण्यासाठी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणणार आहोत. आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विजय मिळवणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवामुळे खचून न जाता, कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन पक्षाला पुन्हा उभारी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आमदार विकले गेले असले, तरी कोकणातील जनता पैसे घेऊन मतदान करणारी नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवावेत जनता आपणास सोबत आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख कालिदास कांदळगावकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख संपर्कप्रमुख राजू नाईक, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसूजा, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, महिला जिल्हा संघटिका श्रेया परब, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, तालुका महिला संघटिकाभारती कासार, नम्रता झारापकर, सावंतवाडी शहर संघटिका श्रुतिका दळवी, सावंतवाडी शहर प्रमुख शैलेश गवंडळकर यांच्यासह विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.