वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे काल शुक्रवारी सायंकाळी कुडाळ, बेळगाव येथील पर्यटनासाठी आलेल्या परिवारातील 7 इसम समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली होती.यातील तिघांचे मृत्यू झाले होते. तर एक तरुणी बचावली होती. अन्य 4 जण समुद्रात बेपत्ता झाले होते.
दरम्यान शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या बेपत्ता असलेल्या 4 पर्यटकांपैकी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.यामध्ये फराहान मोहम्मद मणियार वय 21 वर्षे रा. गुढीपूर कुडाळ याचा मृतदेह रात्री सागरतीर्थ समुद्रकिनारी आढळून आला. तर इकवान इमरान कित्तूर वय 15 वर्षे राहणार, लोंढा बेळगाव याचा मृतदेह सकाळी 11.15 वाजता मोचेमाड समुद्रकिनारी आढळून आला.
दरम्यान मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानव्ये ड्रोनद्वारे तसेच स्थानिक बोटीद्वारे वेंगुर्ले समुद्री हद्दीत सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनामार्फत प्रभावीपणे शोधमोहीम सुरु होती. दरम्यान मयत बाबत वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद झाली असून पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.