Sharad Pawar statement in Amboli
सावंतवाडी : पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याविरोधात केंद्र सरकारने ठोस भूमिका घेऊन उत्तर द्यावे. या परिस्थितीत केंद्र सरकारच्या पाठीशी सर्व पक्षांनी उभे राहिले पाहिजे. त्यात कोणतेही राजकारण करू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.२५) व्यक्त केले. ते आंबोली येथील ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, धर्म विचारून एखाद्या पर्यटकाला मारणे, हे भयंकर कृत्य आहे. दहशतवादविरोधात सर्वपक्षीयांनी सरकारसोबत राहिले पाहिजे. पण सरकारने एखादा निर्णय घेताना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही? याची दक्षता घेतली पाहिजे. यावेळी त्यांनी काही लोक धर्माबाबत अधिक बोलतात, त्यांनाच सरकार पाठिंबा देते, हे योग्य नसल्याचेही नमूद केले.
पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यामुळे, सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आमचा पाठिंबा असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. हल्ला भारतावर झालेला आहे, त्यामुळे सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे. पण सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे. एखादा निर्णय घेतला, तर तो तडीस न्यावा, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने पाकिस्तानवर काही निर्बंध लादले आहेत, पण हे निर्बंध लादत असताना सरकारने थोडासा विचार करावा, असे मत पवार यांनी व्यक्त केले. भारताची विमानसेवा जर पाकिस्तानातून जात असताना बंद केली, तर त्याचा परिणाम भारतावरच होईल. असे अनेक निर्णय आहेत. पण यातून पाकिस्तानलाही एक संदेश जाईल, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, माजी मंत्री प्रविण भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
आंबोली, येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रात उसाची नवी क्रांती होण्यासाठी महत्वपूर्ण संशोधन यशस्वी करण्याचा प्रयत्न आंबोली येथे सुरु आहे. ३५ कांड्यापर्यंत उसाची उंची वाढणार आहे. त्यातून जास्त साखर उत्पन्न मिळेल. त्यासाठी आढावा बैठक घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापरही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार गुरुवारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन त्यांनी संशोधकांशी चर्चा केली. वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रात काजूवर नवनवीन प्रक्रिया उद्योग उभे राहत असल्याची माहिती त्यांनी घेतली. "हे भूषणावह आहे. असे असले तरी काजू पिकांबाबत जनतेत किती उत्साह आहे, हेही तपासून घेतले पाहिजे. पण संशोधनाचे काम चांगले चालले आहे," असे पवार म्हणाले.