कणकवली नगरपंचायतीचा पुढील नगराध्यक्ष कोण? (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

कणकवलीत शहर विकास आघाडीचा नवा फॉर्म्युला चर्चेत; संदेश पारकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गाठ

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

पुढारी वृत्तसेवा

कणकवली (प्रतिनिधी) :
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय गटांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी “शहर विकास आघाडी”चा नवा फॉर्म्युला आता प्रत्यक्षात उतरवला जाणार असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान शहरातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. भाजपविरोधात एकत्र लढण्यासाठी शहर विकास आघाडीची आखणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या आघाडीद्वारे एकसंघ पॅनल उभे करून निवडणुकीत उतरायचे ठरले असून, त्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

बैठकीस युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सोमा गायकवाड, सुजित जाधव, प्रथमेश सावंत, रुपेश नार्वेकर, उत्तम लोके, उमेश वाळके, संकेत नाईक, जयेश धुमाळे, कन्हैया पारकर, सोहम वाळके, तेजस राणे, दादा परब, बाळू मेस्त्री, सी. आर. चव्हाण, अविनाश सावंत, दिव्या साळगावकर, योगेश मुंज, वैभव मालांडकर आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी नगरपंचायत निवडणुकीत कोणत्या विभागात कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची, प्रचाराची दिशा कशी ठेवायची, तसेच एकत्रित आघाडीचे धोरण काय असावे यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व गटांनी एकत्र येऊन कणकवली शहरात सत्ताबदल घडवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त केला गेला.

बैठकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातील लढाईत अधिक समन्वय आणि एकजूट आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. “आम्ही सर्वजण एकत्र आलो तर कणकवली नगरपंचायतीत परिवर्तन निश्चित आहे,” असे वक्तव्य या बैठकीत करण्यात आले. ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि काँग्रेस या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी “शहर विकास आघाडी”च्या नावाखाली एकत्र येऊन भाजपविरोधात ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे.

संदेश पारकर यांनी या बैठकीत बोलताना सांगितले, “आमचं लक्ष्य सत्ता नव्हे, तर शहराचा सर्वांगीण विकास आहे. त्यामुळे सर्वांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून लोकहितासाठी एकत्र येणं गरजेचं आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी उत्साहाने जयघोष केला.

शहरातील राजकीय समीकरणे या आघाडीमुळे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. भाजपसाठी ही नवीन आघाडी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच “शहर विकास आघाडी”चा नवा फॉर्म्युला चर्चेत आला असून, आगामी दिवसांत या आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT