कुडाळ : कुडाळ शहरातील नक्षत्र टॉवर समोरील मुख्य रस्त्यावर एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गोविंद श्रीकांत परब (30 वर्षे, रा.आंदुर्ले - घाटवाडी) या युवकाला गंभीर दुखापत झाली. त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात मंगळवारी रात्री 9.15 वा.च्या सुमारास झाला.
राज्य परिवहन महामंडळाची पणजी - धाराशिव एसटी बस कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर नक्षत्र टॉवर समोर आली असता कुडाळ पोस्ट ऑफीस चौक जवळून आंदुर्लेच्या दिशेने जाणार्या गोविंद परब याच्या दुचाकीची एसटीला समोरून धडक बसली. दरम्यान जोरदार पाऊस कोसळत होता. त्यातच हा अपघात झाला. एसटी चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविले, त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. धडक झाल्यानंतर स्वार परब हा दुचाकीसह रस्त्यावर पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तेथे त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती ठिक आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी अपघातस्थळी भेट दिली. हवालदार मंगेश शिंगाडे, वाहतूक पोलीस अमोल बंडगर यांनी पंचनामा केला. कुडाळ एसटी आगार प्रमुख रोहित नाईक यांनीही घटनास्थळी भेट दिली. एसटी बसमधील प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या अपघाताची खबर एसटी चालक तौफिक इलाई मुलाणी (33, कोल्हापूर आगार) यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली.