सिंधुदुर्ग : समुद्रात उतरण्यापूर्वी स्‍कुबा डायव्‍हर. दुसऱ्या छायाचित्रात समुद्र तळाशी जाताच स्‍कुबा डायव्हरची टॉर्चच्‍या सहाय्याने नौकेवरील महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा बोर्ड हायलाईट करण्याचा प्रयत्न केला. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg | गुलदार नौका ठरलेल्या जागी स्थिरावली!

पर्यटन महामंडळाचे मिशन फत्ते; स्‍कुबा डायव्हर पाहून आले

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : हो...ईएक्सआयएनएस गुलदार ही भारतीय नौदलाची सेवानिवृत्त नौका अखेर निवती रॉक समुद्राच्या तळाशी ठरलेल्या ठिकाणी स्थिरावली आहे. पर्यटन महामंडळाने समुद्राच्या तळाशी पाठविलेले स्‍कुबा डायव्हर स्थिरावलेल्या नौकेचे फोटो घेऊन सुखरुप माघारी परतले. पर्यटन महामंडळाची ही मोहीम फत्ते झाल्‍याचा आनंद प्रादेशिक व्‍यवस्थापक दीपक माने यांनी व्‍यक्‍त केला आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने आखला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ४६ कोटी आणि राज्य सरकारने ११२ कोटी असा निधी त्यासाठी तरतूद केला आहे. 'अंडरवॉटर म्युझियम' उभारणीचा हा प्रकल्प आहे. जी नौका समुद्राच्या तळाशी स्थिर झाली आहे, तिच्यावर पुढच्या दीड वर्षात समुद्री प्रवाळ व इतर समुद्र जीवसृष्टी निर्माण होणार आहे. त्यानंतर तिथे पर्यटकांना स्‍कुबा डायव्हिंगद्वारे आणि पाणबुडीद्वारे पाठविण्यात येणार आहे. १९ मे रोजी ही नौका समुद्रात बुडविण्यात आली होती. त्यासाठी तब्बल १७ तासांचा कालावधी तज्ज्ञांना लागला. ही बोट बुडाली खरी; परंतु जिथे तिची जागा ठरविली होती तिथेच नेमकी बुडाली का, हा एक प्रश्न होता.

नौका समुद्रसपाटीपासून चार मीटर आत

ही बोट बुडाल्‍यानंतर ४८ तासांनी पर्यटन महामंडळाने तीन स्‍कुबा डायव्हरना समुद्राच्‍या तळाशी पाठविण्याचा निर्णय घेतला. जितेश वस्त, थॉमसन आणि संकेत गावडे या तीन बहाद्दूरांनी सर्व तयारीनिशी समुद्रात उडी घेतली आणि काही सेकंदांत ते २२ मीटर खोल समुद्रतळाशी पोहोचले. समुद्रसपाटीपासून चार मीटर आतमध्ये पाण्यात गेल्यानंतर लगेचच त्यांना बुडालेली गुलदार नौका दिसली. टॉर्चच्‍या सहाय्याने ते नौकेपर्यंत पोहोचले. त्यांनी व्हिडीओ केला आणि पुन्‍हा सुरक्षितरीत्या मागे परतले. पाण्यावर येताच त्यांनी अधिकाऱ्यांना गुड न्‍यूज दिली.

हे यश खूप मोठे : माने

पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्‍यवस्थापक दीपक माने म्हणाले, या संपूर्ण प्रकल्पासाठी मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी प्रेरणा दिली, साथ दिली. या प्रकल्पाची अंमलबजावणी होत असताना खूप आनंद होत आहे. नौका ठरलेल्या ठिकाणी स्थिरावली आहे. आता तिथे प्रवाळ निर्माण होण्यास सुरुवात होणार आहे. तोवर गुलदारपासून ५०० मीटर परिघामध्ये मच्छिमारी करता येणार नाही. कुणालाही प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी बोयो लावण्यात आल्याची माहितीही माने यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT