विरण ः श्रावण येथून मसुरे येथे आपल्या वडिलांना आणायला जात असताना स्कूटर वरील ताबा सुटून स्कूटरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्वप्निल बापू दळवी (वय 42, रा. श्रावण दळवीवाडी, ता. मालवण) हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी 4.45 वा. च्या दरम्यान मसदे-गावडेवाडी येथे घडली. अपघातग्रस्त गंभीर तरुणाला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.
श्रावण येथील स्वप्निल दळवी हा आपले वडील बापू दळवी यांना मसुरे येथून आणण्यासाठी प्लेजर स्कूटरने जात होता. तर ट्रॅक्टर घेऊन चालक चाफेखोल येथून पोईप येथे जात होता. दरम्यान मसदे-गावडेवाडी येथे स्वप्निल दळवी याचा स्कूटरवरील ताबा सुटला व स्कूटर ट्रॅक्टरच्या पुढील भागाला जोरदार धडकली. यात स्वप्निल हा रस्त्यावर पडला. त्याच्या नाका-तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो अत्यवस्थ झाला. याबाबत माहिती मिळताच जि. प. माजी सभापती अनिल कांदळकर व ग्रामस्थांनी रुग्णवाहिका आणून स्वप्निल याला सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची खबर मसदे पोलिस पाटील निनाद माड्ये यांनी मालवण पोलिस स्थानकात दिली. मालवणाचे पीएसआय संदीप खाडे, कॉन्स्टेबल राजाराम तेरेखोलकर, होमगार्ड राहुल कदम यांनी घटनास्थळी पंचनामा केला व अपघातग्रस्त दोन्ही वाहने पुढील कारवाईसाठी मालवण पोलिस स्थानकात जमा केली. अपघातप्रसंगी अनिल कांदळकर, दयानंद प्रभूदेसाई, विलास पांजरी, पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहायक राकेश परब, बिजू वंजारे, समीर हडकर, जितेंद्र परब, चेतन पाटकर व इतरांनी सहकार्य केले.