सावंतवाडी ः रेल्वे टर्मिनस परिसरात जागेची पाहणी करताना आ. दीपक केसरकर. सोबत संजू परब, अशोक दळवी, कृष्णकांत परब आदी. (छाया ः हरिश्चंद्र पवार)
सिंधुदुर्ग

सावंतवाडी टर्मिनसवरील प्रस्तावित ‘रेलटेल’ हॉटेलसाठी आ. केसरकरांकडून जागेची पाहणी

‘सिंधू रत्न’ योजनेतून काही कॉटेजेस् उभारण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर प्रस्तावित ‘रेल टेल’ हॉटेल बांधण्याच्या पार्श्वभूमीवर माजी शिक्षणमंत्री, सिंधूरत्न समिती अध्यक्ष आ. दीपक केसरकर यांनी बुधवारी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची पाहणी केली. सावंतवाडी स्टेेशनवर प्लॅटफॉर्म नंबर तीनच्या बाजूला ‘रेल टेल’ हॉटेल उभारण्यात येणार असून तूर्तास ‘सिंधू रत्न’ योजनेतून काही कॉटेजेस् उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी रेल्वेस्टेशन मास्तर कृष्णकांत परब, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अभियंता श्री. फुले, श्री. जयप्रकाश तसेच या योजनेचे सूरज परब, सुनील परब, श्री. गाड, आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सचिव योगेश तेली, सा. बां. चे अभियंता वैभव सगरे, नंदू शिरोडकर, आबा केसरकर आदी उपस्थित होते. कोकण रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी टर्मिनसवर ‘रेल टेल’ हॉटेलसाठी जागा निश्चित केली आहे. सद्यस्थितीत प्लॅटफॉर्म क्र.3 च्या बाजूच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून हा रस्ता आणि रेल्वे प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी ‘रेलटेल’ हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे, अशी माहिती आ. केसरकर यांनी यावेळी दिली.

आ. केसरकर म्हणाले, सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून सावंतवाडी रेल्वे स्थानकावर छोटी कॉटेजीस् बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान रेल्वे विभागाने जागेची कमतरता असल्याने आता रस्ता बनविला आहे. त्या भागात आणखी एक प्लॅटफॉर्म बनविण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे प्लॅटफॉर्मवर रेल टेल हॉटेल बांधण्याबाबत चाचपणी आपण केली आहे. तसेच पहिल्या आणि तिसर्‍या प्लॅटफॉर्मवर निवारा शेड उभारता येईल का? याची पाहणी केली. यासाठी किमान नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले.

काही रेल्वे गाड्यांना या स्थानकावर थांबा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तर रेल्वे गाड्यांत पाणी भरण्यासाठी सुविधा निर्मितीस मंजूरी देण्यात आली आहे. ही मंजूर कामे मार्गी लागण्यासाठी आपण कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. झा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले. तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT