मंत्री दीपक केसरकर. (File photo)
सिंधुदुर्ग

Konkan Railway : सावंतवाडी टर्मिनसच्या इमारतीचे काम १५ दिवस स्थगित

आ. दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर ५ वा प्लॅटफॉर्म आणि पर्यटन सुविधांचे काम एकत्र होणार

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसच्या नवीन इमारतीचे काम कोकण रेल्वेने सुरू केले होते; मात्र या इमारतीमुळे ५ व्या फलाटासाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा गंभीर मुद्दा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आ.दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर तत्काळ दखल घेत आ. केसरकर यांनी कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेअंती सावंतवाडी टर्मिनसच्या सुरू असलेल्या कामाला १५ दिवसांची स्थगिती देण्यात आली असून, ५ वा प्लॅटफॉर्म आणि पर्यटकांसाठीच्या सुविधांचे (टुरिस्ट फॅसिलिटी) काम एकाच वेळी हाती घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत आ.केसरकर यांनी ही माहिती दिली.

आपल्या श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना श्री. केसरकर म्हणाले , फलाट क्रमांक ४ वर पर्यटन सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होता, परंतु तेथे कॉलमचे काम करताना रेल्वेची केबल तुटून रेल्वे सेवा ठप्प होण्याचा धोका होता. त्यामुळे हा निधी शेजारील जमिनीसाठी राखून ठेवण्यात आला असून तो सध्या अखर्चित आहे. आता लवकरच रेल्वेची विशेष टीम या जागेची पाहणी करणार असून, नवीन उत्तम स्टेशन आणि ५ वा प्लॅटफॉर्म अस्तित्वात आल्यानंतर सावंतवाडीत रेल्वे गाड्या थांबण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय सावंतवाडी टर्मिनस येथे गाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून विशेष योजना मंजूर करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. तिलारीच्या या योजनेतून मळगावसह न्हावेली, निरवडे, वेत्ये या गावांना आणि पुढे थेट चिपी विमानतळापर्यंत पाणी पोहोचवले जाणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळेल. कोकण एक्सप्रेस-वे, कोस्टल रोड आणि नॅशनल हायवे हे तिन्ही महत्त्वाचे मार्ग या रस्त्याला जोडले जाणार असल्याने सावंतवाडीसह कुडाळ, कणकवली, मालवण आणि देवगड येथील पर्यटन स्थळांना मोठा बूस्ट मिळणार असून, संपूर्ण जिल्ह्याला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल, असा दावा आमदार दीपक केसरकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT