सावंतवाडी : सावंतवाडीतील ब्रिटीश कालीन जिल्हा कारागृहाच्या तटबंदीची भिंत कोसळल्यानंतर सोमवारी या कारागृहाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट विशेष टीमकडून करण्यात आले, पालकमंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या सूचनेनंतर ही टीम सोमवारी येथे दाखल झाली. कारागृहाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या दगडांच्या जॉईंटमधील माती ठिसूळ होऊन त्यात पावसाचे पाणी गेल्याने हे बांधकाम कोसळल्याचा प्राथमिक अंदाज या टीमकडून व्यक्त करण्यात आला.
सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या ब्रिटीशकालीन इमारतीची तटबंदीची भिंत शुक्रवारी सकाळी कोसळली होती. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या असलेल्या या इमारतीच्या तटबंदीच्या भिंतीवर अलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव साडेचार फुटाचे दगडी बांधकाम केले होते. एकूणच या बांधकामाचे वजन न पेलल्यामुळे ही भिंत पडल्याचा आरोप करण्यात येत होता. ब्रिटीशकालीन बांधकाम असल्याने सार्वजनिक बांधकामवर अनेकांनी दोष ठेवला होता. पालकमंत्री नीतेश राणे यांनीही याची दखल घेत तत्काळ पडलेल्या भिंतीची पाहणी करतानाच संपूर्ण कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सूचना संबंधितांना दिली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी येथे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी विशेष टीम दाखल झाली.
स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आलेल्या टीममध्ये सा. बां. रत्नागिगरी विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंता सलोनी निकम, उपविभागीय अभियंता वैभव सगरे, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हा पूरचे प्रा. महेश साळुंखे, कोल्हापूरचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट मंदार आंबेकर आदी उपस्थित होते.
ही इमारत ब्रिटीशकालीन असून ती माती आणि दगड यापासून बांधलेली होती. या बांधकामाला दीडशे वर्ष झाल्याने बांधकामासाठी वापरलेली माती ठिसूळ झाली. तसेच पावसाचे पाणी दोन दगडांमधील जॉईंटमध्ये गेल्याने बांधकामाला धोका निर्माण झाला आणि यातून ही भिंत कोसळली, असा प्राथमिक अहवाल या पथकघाने तयार केला. याचा अंतिम अहवालनंतर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सा. बां. चे उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांना विचारले असता, या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट लवकरच घेतला जाणार आहे. या रिपोर्टनुसार जिल्हा कारागृहाचे नवीन बांधकाम जुन्या पद्धतीचे किंवा नव्या धर्तीवर उभारले जाईल. या संदर्भातील अहवाल कामे वरिष्ठांकडे सादर करणार आहोत त्यानुसार पुढील आदेश होणार आहेत.