बाप्पा चालले आपुल्या गावाला..! File Photo
सिंधुदुर्ग

Sawantwadi News | बाप्पा चालले आपुल्या गावाला..!

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : शहरात दीड दिवसाच्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या राजवाड्यातील लाल गणपतीचे देखील राजघराण्याच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी येथील मोती तलावात विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला शनिवारी प्रारंभ झाला.

पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून घरोघरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नातेवाईक, पाहुणे, मंडळींनी एकमेकांच्या घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र
भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते.

महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या. शनिवार सायंकाळी ६ वा. पासून दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणकास प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीने खास आयोजन करण्यात आले होते. पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता. शहरात अनेक ठिकाणी पाच, सात, अकरा दिवस तर २१ दिवसांच्या तीन मानाच्या गणपतींचा सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. सावंतवाडीच्या ऐतिहासिक राजघराण्याच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर शहरातील इतर गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ऐतिहासिक राजघराण्यातील दीड दिवसांच्या गणपतीच विसर्जन मोती तलाव येथे करण्यात आले.

युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, राजकन्या उर्वशीराजे भोसले यांच्या उपस्थितीत मंगलमुर्तीची राजवाडा येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. राजवाडा व ऐतिहासिक माठ्यातील दोन्ही गणपतींचे राजघराण्याकडून एकत्रित विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT