नगरसेवक संजू परब  
सिंधुदुर्ग

Moti Lake Development : मोती तलावाच्या विकासाला राजघराणेच विरोध करणार!

नगरसेवक संजू परब यांची टीका : कामाला प्रशासकीय मान्यता घेऊन मगच ते जाहीर करण्याचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : गेल्या दहा वर्षांत राजघराण्याच्या अंतर्गत वादामुळे सावंतवाडी शहरात मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल होऊ शकले नाही आता मोती तलावाचा विकास काय होणार. या तलावाच्या विकासाला उद्या हेच राजघराणे विरोध करणार त्यामुळे अशा घोषणा, आराखडे तयार करून जनतेला फसवू नका, हे सर्व करण्यापूर्वी अगोदर नगरसेवकांना विश्वासात घ्या, त्यासाठी प्रशासकीय मान्यता घेऊन मगच जाहीर करा, असा सल्ला नगराध्यक्षा यांना शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक संजू परब यांनी दिला.

संजू परब शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले नगराध्यक्षा यांनी मोती तलावाचा विकास करण्याचे ठरवले आहे. त्याचा आराखडा तयार करून नुकतेच त्याचे सादरीकरण मुंबईत करण्यात आले. सुरुवातीला मोती तलावाचा विकास होतोय हे ऐकूनच मला हसू आले. तलावाचे ऐतिहासिक महत्व टिकवून याचा भौतिक विकास होईल, असे नगराध्यक्षा सांगत आहेत तर तलावाच्या आत सध्या कोंक्रीटची भिंत का उभारली जात आहे,याचे उत्तर त्यांनी द्यावे. अशा घोषणा व आराखडे सादर करून तुम्ही कोणाला फसवत आहात? असा सवाल परब यांनी करत तलावाचा विकासाचा आराखडा मंजूर आहे का? त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली का? याचे अगोदर त्यांनी उत्तर द्यावे. आम्ही नगरपालिकेत सदस्य आहोत. आमच्यासमोर हा आराखडा ठेवा, सूचना घ्या, मगच तो जनतेसमोर ठेवा. स्वतः आराखडे तयार करायचे, बैठकाना जायच, कोणाला काही माहिती नाही कल्पना नाही, कोण नगरसेवक उपस्थित होते, याचे उत्तर नाही आणि मुंबईवरून आल्यावर घोषणा करायची याला काहीच अर्थ नाही, असे परब म्हणाले.

या प्रकल्प बाबत नगरसेवक यांना कोणतीही कल्पना दिली गेली नाही त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकत नाही. या तलावावर अगोदरच राजघराण्याची केस आहे. कोणतेही सुशोभीकरण करण्यास पालिकेला अडवले जाते. गेल्या दहा वर्षात हॉस्पिटल झाले का, त्यांचे अंतर्गत वाद आहेत पुन्हा हेच राज घराणे तलावाचे विकास काम अडवणार, या गोष्टी होतच राहणार याची जाणीव नगराध्यक्षांनी ठेवावी, असा टोला परब यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT