चोरी करणाऱ्यांनीच फिर्याद देण्याचा हा प्रकार! 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : चोरी करणाऱ्यांनीच फिर्याद देण्याचा हा प्रकार!

सावंतवाडी न. प. पाणीपुरवठा विभागातील कारवाई प्रकरणी शिवसेना नगरसेविकेंची टीका

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील वस्तू नोंद व वापर रजिस्टर (स्टॉक रजिस्टर) गायब करून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी जोडारी भारत लाखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईतील विरोधाभास आणि नगरपालिकेच्या संशयास्पद भूमिकेवर शिवसेना नगरसेविका ॲ‍ड. सायली दुभाषी आणि शर्वरी धारगळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. "चोरी करणाऱ्यांनीच फिर्याद देण्याचा हा अजब प्रकार असून, या घोटाळ्याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे," अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

​अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात

नगरपालिकेच्या नियमानुसार स्टॉक रजिस्टर लिहिण्याचे काम जोडारी करत असला, तरी ते सुरक्षित ठेवण्याची मुख्य जबाबदारी विभागप्रमुखांची असते. त्यामुळे रजिस्टर गहाळ झाल्याची मूळ फिर्याद देण्याचा अधिकार पाणीपुरवठा विभागप्रमुखांचाच आहे. परंतु, तक्रारदार अधिकारी संजय पोईपकर यांनी ऑडिटसाठी पुरवठादाराकडून दीड लाख रुपये घेतल्याची जाहीर कबुली समितीच्या सभेत दिलेली आहे, तर पुरवठादारानेही पैसे दिल्याचे मान्य केले आहे. ज्या व्यक्तीवर स्वतः भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, तीच व्यक्ती आरोपीविरोधात पोलिसात फिर्याद कशी दाखल करू शकते? असा सवाल करत ‘चोरांनीच तक्रार देण्याचा हा प्रकार असून यात मोठे मासे लपले असण्याची शक्यता’ दोन्ही नगरसेविकांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पथकाची मागणी

या संपूर्ण भ्रष्टाचारात केवळ जोडारीच नव्हे तर मुख्याधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिकेच्या या सावळागोंधळावर आणि भ्रष्टाचाराविरोधात विभागप्रमुखांनी स्वतः फिर्याद दाखल करणे बंधनकारक आहे.

​या प्रकरणामुळे सावंतवाडी नगरपालिकेच्या प्रतिमेला मोठा डाग लागला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करावी आणि मुख्याधिकारी, तक्रारदार अधिकारी व या घोटाळ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या प्रत्येकाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी अधिकृत मागणी करण्यात येणार असल्याचे ॲ‍ड. सायली दुभाषी व शर्वरी धारगळकर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT