नागेश पाटील
सावंतवाडी ः सावंतवाडी नगरपालिकेच्या बुधवारी होणाऱ्या पहिल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष निवड होणार आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने भाजपला आपला उमेदवार निवडून आणणे कठिण नाही. मात्र, भाजप नेते खा. नारायण राणे यांनी ‘एल्गार मेळाव्यात’ भाजप-शिवसेना एकसंघ असल्याचे दाखवत यापुढील जिल्ह्यातील सर्व निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढविल्या जातील, असे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर 14 जानेवारी रोजी होणाऱ्या सावंतवाडी उपनगराध्यक्ष निवडणुकीत युती होणार काय? खा. राणेंची सूचना अमलात येणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सावंतवाडी नगरपालिका उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड बुधवार, 14 रोजी होणार आहे. तब्बल साडेचार वर्षांच्या कालावधीनंतर सावंतवाडी नगरपालिकेचे लोकमान्य टिळक सभागृह या विशेष सभेने गाजणार आहे. या सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे. पालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यांच्याकडे नगराध्यक्ष व 11 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आज घडीला भाजपचा उपनगराध्यक्ष होणार हे उघड आहे. मात्र ही निवडणूक युतीच्या माध्यमातून लढविण्याचे प्रयत्न महायुतीच्या काही नेत्यांचा आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास उपनगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला जाईल, असे मानले जात आहे. नगरपालिकेत 7 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून, गटनेते पदी नगरसेवक बाबू कुडतरकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे युती झाल्यास उपनगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागू शकते.
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजू परब यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख पद असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. सध्या महापालिका निवडणुका जोरात सुरू असून, मुंबईतील काही भागांची जबाबदारी शिवसेना पक्षाने जिल्हाप्रमुख संजू परब यांना दिली आहे. त्यामुळे ते सध्या महापालिका निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत म्हणून सावंतवाडी नगरपालिका गटनेते पदाची जबाबदारी बाबू कुडतरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेनेत युती व्हावी व युती करुनच या निवडणुका लढविल्या जाव्यात अशी सूचना भाजप नेते खा.नारायण राणे यांनी केली होती. त्याला युतीतील नेते आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे तसेच पालकमंत्री नीतेश राणे यांनीही सहमती दर्शविली होती. मात्र, काही कारणांमुळे युती होवू शकली नाही त्याचा फटका कणकवली व मालवणमध्ये भाजपला सहन करावा लागला. कणकवली, मालवण मध्ये झालेल्या पराभवाचा धडा घेऊन पुढे त्याची पुनरावृत्ती होवू नये याकरिता आगामी उपनगराध्यक्ष निवड, जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये युती व्हावी यासाठी खा. नारायण राणे प्रयत्नशील आहेत.
खा. राणे यांनी गेल्याचा आठवड्यात बांदा ते कणकवली अशी ‘एल्गार रॅली’ काढली होती. या रॅलीत भाजप-शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीला ‘न भूतो न भविष्यती’ असे अभूतपूर्व यश मिळाले होते. त्यानंतर कणकवली येथे राणेंच्या उपस्थितीत महामेळावा घेण्यात आला. त्याला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावरुन खा. राणे यांनी यापुढील सर्व निवडणुका युती करुन लढविल्या जातील असे स्पष्ट संकेत दिले होते. आता खा. राणे यांचे हे संकेत सावंतवाडी, वेंगुर्ला नगरपालिका उपनगराध्यक्ष निवडीत प्रत्यक्षात उतरणार काय? याची उत्सुकता आहे.
जर सावंतवाडी उपनगराध्यक्ष निवड युतीच्या माध्यमातून झाली नाही तर भाजप व शिवसेना यांच्यात नगरपालिका कारभारावरुन सातत्याने संघर्षाची ठिणगी पडू शकते. दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने आयोजित एसटी बसस्थानक परिसर स्वच्छता मोहिमेत शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलण्यात आले होते. त्यावरुन शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला होता. नगराध्यक्ष पदाचा कारभार भाजपने हाती घेतल्यानंतर शिवसेनेकडून कचरा डेपो, अस्वच्छ स्वच्छतागृहे, शहरातील प्रलंबित मुलभूत प्रश्न, समस्या यांची पोलखोल करत त्या प्रशासनासमोर मांडण्यास सुरुवात केली आहे यावरुन दोघांमध्ये सातत्याने सुप्त संघर्ष उफाळून येत असून आपले वर्चस्व दाखविण्याची एकही संधी शिवसेनेकडून सोडली जात नसल्याचे चित्र आहे.
युती न झाल्यास संघर्ष अटळ
युती झाली नाही व उपनगराध्यक्षपद मिळाले नाही, तर शहरातील आपले अस्तित्व शिवसेनेला कामातून दाखवावे लागणार आहे. त्यामुळे प्रसंगी सत्ताधारी मित्र पक्षाच्या विरोधात जाऊ न भूमिका घेण्याची तयारी शिवसेनेने ठेवली आहे. यावरून सावंतवाडी उपनगराध्यक्ष निवडीत युती न झाल्यास पुढे संघर्ष अटळ आहे, असेच म्हणावे लागेल.