Mount Everest  
सिंधुदुर्ग

Pritam Sawant Everest Base Camp | देवसूच्या प्रितम सावंत यांची एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर यशस्वी चढाई

Pritam Sawant Everest Base Camp | प्रतिकूल हवामानावर मात करत गाठले ५,३६४ मीटरचे शिखर

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या जोरावर कोकणच्या सुपुत्राने पुन्हा एकदा हिमालयातील दुर्गम पर्वत रांगांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथील प्रितम गुरुनाथ सावंत यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या 'बेस कॅम्प'वर (ईबीसी) यशस्वी चढाई केली आहे.

सुमारे ५३६४ मीटर उंचीवर भारताचा तिरंगा फडकवत त्यांनी देवसू गावासह संपूर्ण सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गिर्यारोहणाची विशेष आवड असलेल्या प्रितम सावंत यांनी हे आव्हानात्मक लक्ष्य १३ दिवसांच्या अत्यंत कठीण ट्रेकिंगनंतर साध्य केले. या प्रवासात त्यांनी तब्बल १२० किलोमीटरचे अंतर पायदळी तुडवले.

समुद्रसपाटीपासून प्रचंड उंचावर असलेल्या या भागात उणे १५ अंश सेल्सिअस तापमान, हाडे गोठवणारे वारे आणि ऑक्सिजनची सतत घटणारी पातळी अशा अनेक जीवघेण्या संकटांचा सामना त्यांना करावा लागला. डोळ्यांना दिसेल तिथपर्यंत पसरलेली अंतहीन चढाई आणि क्षणाक्षणाला बदलणारे हिमालयातील हवामान अशा परिस्थितीतही प्रितम यांनी आपला संयम ढळू दिला नाही.

अतिउंचीवरील हवामानामुळे शरीरावर होणारे परिणाम कधीकधी जीवघेणे ठरू शकतात, अशावेळी शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरताही महत्त्वाची ठरते. प्रितम यांना या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी त्यांचे मोठे भाऊ आणि हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटचे प्रमाणित गिर्यारोहक प्रसाद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रसाद यांच्या तांत्रिक अनुभवाचा प्रितम यांना या मोहिमेत मोठा फायदा झाला. प्रितम सावंत यांनी यापूर्वीही आपल्या साहसाची चुणूक दाखवली आहे. त्यांनी लडाखमधील अत्यंत आव्हानात्मक समजली जाणारी मनाली-लेह-खार्दुगला ही ५५० किलोमीटरची सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली होती. त्यानंतर आता एव्हरेस्ट बेस कॅम्पवर त्यांनी केलेली यशस्वी चढाई ही त्यांच्या जिद्दीचा नवा अध्याय ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सावंतवाडी परिसरातून आणि विशेषतः गिर्यारोहण क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT