सावंतवाडी : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहराचे सौंदर्य आणि अस्मिता जपण्यासाठी न. प. प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा चतुर्थी काळात शहरातील ऐतिहासिक मोती तलाव काठी बॅनरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम डावलून बेकायदेशीर बॅनर लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्षा श्रद्धा राजे सावंत-भोसले यांनी दिला आहे. शहरातील वाहतूक नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, महिला बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेविका निलम नाईक, सुकन्या टोपले आणि आनंद नेवगी आदी उपस्थित होते.नगराध्यक्षा म्हणाल्या, मोती तलाव हे शहराचे मुख्य आकर्षण असल्याने दरवर्षी सणासुदीच्या काळात तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात फलक (बॅनर) लावले जातात. यामुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्य झाकले जाते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने यंदा तलाव परिसरात एकही बॅनर लावू न देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ठरवून दिलेल्या केवळ ७ नियोजित जागांवरच ८ बाय १० या आकाराचे बॅनर लावण्याची अधिकृत परवानगी दिली जाईल. विनापरवानगी किंवा नियमांचे उल्लंघन करून लावलेले बॅनर पालिका प्रशासन जप्त करेल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करेल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.