सावंतवाडी : सावंतवाडी येथील प्रसिद्ध मोती तलावात दोन मोठ्या मगरी असल्याचे समोर आले आहे. या तलावात सध्या संगीत कारंजा उभारणीचे काम सुरू असून, कोणताही अपघात होऊ नये यासाठी या मगरींना पकडण्याचे (रेस्क्यू) काम वनविभागाने हाती घेतले आहे. संगीत कारंजाचे काम करणार्या ठेकेदाराने पालिका प्रशासनाकडे या मगरींना सुरक्षितपणे हलवण्याची मागणी केली होती.
पालिकेच्या मागणीनुसार, वनविभागाने या मगरींना पकडण्यासाठी सापळे लावले आहेत. या तलावात अनेक लोक आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी येत असल्यामुळे आणि मगरी थेट कारंजाच्या जागेवर येऊन बसत असल्यामुळे तातडीने ही कारवाई करणे आवश्यक झाले आहे. पालिका प्रशासनाने यासंदर्भात वनविभागाकडे लेखी मागणी केली होती, ज्याला वनविभागाच्या अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे.
गेल्या सहा वर्षांपूर्वीदेखील या तलावात एक मोठी मगर आढळली होती. तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ती तलावाच्या सांडव्यात मृतावस्थेत सापडली होती आणि तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते. आता पुन्हा एकदा मगरी पकडण्याचे ऑपरेशन सुरू झाल्यामुळे वनविभाग आणि पालिका प्रशासनाचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनविभागाचे पथक प्रमुख बबन रेडकर, वन कर्मचारी प्रथमेश गावडे, राकेश अमृस्कर, पुंडलिक राऊळ, शुभम कळसुलकर, आनंद राणे आणि शुभम फाटक यांचा सहभाग आहे.