सावंतवाडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच-खंडपीठाच्या निर्मितीच्या निर्णयाचे सावंतवाडी तालुका वकील संघटनेने मोठ्या उत्साहात स्वागत केले. या खंडपीठासाठी सर्वप्रथम सावंतवाडी वकील संघटनेनेच लढा सुरू केला होता, अशी भावना संघटनेचे अध्यक्ष अॅड. बी. बी. रणशूर यांनी व्यक्त केली.
शनिवारी सावंतवाडी येथील न्यायालयात वकिलांची तातडीची बैठक घेऊन जल्लोष करण्यात आला. या लढ्याचे नेतृत्व करणारे जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर आणि अॅड. सुभाष पणदूरकर यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अॅड. बी. बी. रणशूर म्हणाले की, या खंडपीठाच्या लढ्यात सावंतवाडी बार असोसिएशनचा सर्वात मोठा वाटा आहे. अॅड. एल. बी. देसाई यांच्यापासून या लढ्याची सुरुवात झाली. अॅड. दिलीप नार्वेकर, अॅड. सुभाष पणदूरकर आणि इतर अनेक ज्येष्ठ वकिलांनी आपले तन, मन, धन आणि वेळ खर्च करून हा लढा दिला. आज खर्या अर्थाने सावंतवाडीच्या एकजुटीचा विजय झाला आहे आणि याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
अॅड. दिलीप नार्वेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जिल्हा वकील संघटनेचा अध्यक्ष असताना मी सर्व तालुक्यांतील वकिलांना एकत्र आणून हा लढा सुरू केला. त्यासाठी आम्हांला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, शिक्षाही भोगावी लागली. आता वकिलांनी कोल्हापूर खंडपीठात वकिली सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अॅड. सुभाष पणदूरकर यांनी 35 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या लढ्याच्या आठवणी जागवल्या आणि सांगितले की, आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे, कारण या लढ्याचा फायदा आता ज्युनिअर वकिलांना होणार आहे. अॅड. परिमल नाईक यांनी माहिती दिली की, 18 ऑगस्टपासून कोल्हापूर खंडपीठ कार्यरत होणार आहे.
16 ऑगस्टला या सोहळ्यासाठी सर्व वकिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिलांना कोल्हापूर खंडपीठात वकिली करण्यासाठी जिल्हा वकील संघटना प्रशिक्षण देईल, असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. संदीप निंबाळकर, अॅड. नीता सावंत-कविटकर यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.
जल्लोष करताना जिल्हाध्यक्ष अॅड.परिमल नाईक.सोबत अॅड. दिलीप नार्वेकर, अॅड. बी. बी. रणशूर, अॅड. सुभाष पणदूरकर, अॅड. नीता सावंत-कविटकर, अॅड. प्रकाश परब, अॅड. संदीप निंबाळकर, अॅड. पी. डी. देसाई व अन्य.