सावंतवाडी : केसरी धनगरवाडी येथे बंद घरात शिडीद्वारे उतरून कपाटातील सुमारे 15 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित चोरट्याने मंगळवारी सायंकाळी उशीरा केसरी-धनगरवाडी येथे भरवस्तीत असलेल्या धुळू मुळू पांढरमिसे यांच्या घरावर शिडीने वर चढून आत प्रवेश केला. दिवसा झालेल्या या चोरीच्या प्रकाराने सारेच अवाक झाले आहेत.
पांढरमिसे दांपत्य मंगळवारी सकाळी कामाला गेले होते. सौ. पांढरमिसे दुपारी अडीचच्या सुमारास घरी आल्यावर त्यांना घरातील सामान विस्कटल्याचे दिसले. चोरट्याने प्रथम घराचा दर्शनी भागाचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला त्यांनी पाठीमागे असलेल्या शिडीद्वारे छपरावर चढून घरात प्रवेश केला.
तांदळात लपवून ठेवलेली कपाटाची चावी शोधून काढत कपाट उघडले, आणि 15 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. कागदपत्रे विस्कटून टाकली. सरपंच स्नेहल कासले, उपसरपंच संदीप पाटील, ग्रा.पं.सदस्य गुरु कासले, जयानंद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबोली दूरक्षेत्रचे हवालदार दीपक शिंदे, रामदास जाधव, लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी भेट देत तपास केला. याप्रकरणी संशयित चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चोरटा कोणी माहितगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.