सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील द्वारकामाई इमारत परिसरात उद्भवलेल्या सांडपाण्याच्या गंभीर समस्येची दखल घेत नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतली आहे. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि दूषित पाणी बोरवेलमध्ये झिरपत असल्याच्या तक्रारीनंतर आता संपूर्ण सावंतवाडी शहरातील गृहनिर्माण संस्थांचे सर्वेक्षण केले जाणार आहे, तसे आदेश नगराध्यक्षांनी न. प. प्रशासनाला दिले आहेत.
द्वारकामाई इमारत परिसरात श्री. बांदेकर यांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्याने मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचले आहे. हे सांडपाणी परिसरातील बोरवेलमध्ये जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रहिवाशांच्या तक्रारीनंतर नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रशासनाचे महत्त्वाचे निर्णय व आदेश नगराध्यक्षांनी बैठकीत प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. साचलेले सांडपाणी सक्शन मशीन लावून गटार त्वरित साफ करावे. येत्या १५ दिवसांत सावंतवाडीतील सर्व सोसायट्यांचा सांडपाणी नियोजनाचा सर्व्हे करावा. ज्या सोसायट्यांकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही, त्यांना तातडीने नोटिसा बजावाव्यात, बांदेकर यांच्या घराजवळील गटाराच्या मागणीनुसार बांधकाम विभागाने पाहणी करून योग्य तो तांत्रिक निर्णय घ्यावा, असे आदेशवजा सूचना नगराध्यक्षांनी न. प. प्रशासनाला दिल्या.
मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर तसेच द्वारकामाई बिल्डिंगचे रहिवासी आणि नगरपालिका अधिकारी उपस्थित होते. नगरपालिकेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील सांडपाण्याच्या जुन्या समस्या मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.