सावंतवाडी ः सावंतवाडी शहराच्या मध्यवस्तीत शनिवारी मध्यरात्री आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. वन विभाग कार्यालयासमोरील एका जुन्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. ‘द्वारकामाई’ बिल्डिंगच्या अगदी समोर ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीच्या रौद्र रूपामुळे नागरिक भयभीत झाले. विशेष म्हणजे, घटनेची माहिती देऊनही पालिकेचा अग्निशमन बंब वेळेवर न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
दि. 7 रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास या जुन्या गोदामातून धूर येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाळा आकाशात उठू लागल्या. गोदामात साठवलेल्या वस्तूंनी पेट घेतल्याने मोठ्या स्फोटांचे आवाजही परिसरात ऐकू येत होते. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत धरून घराबाहेर पडले.
आग लागल्याचे समजताच नागरिकांनी तत्काळ सावंतवाडी नगरपालिकेशी संपर्क साधला. मात्र, वारंवार फोन करून आणि आगीचे गांभीर्य लक्षात आणून देऊनही बराच वेळ पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला नव्हता. भरवस्तीत लागलेल्या या आगीमुळे आजूबाजूच्या इमारतींनाही धोका निर्माण झाला होता. अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाने दाखवलेल्या या उदासीनतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अखेरीस अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेनंतर शहराच्या मध्यवस्तीतील अग्निशमन व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.