सावंतवाडी ः सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर असलेले लोखंडी होर्डिंग्ज अत्यंत जीर्ण झाले असून ते कधीही कोसळण्याची भीती आहे. हे धोकादायक होर्डिंग्ज पालिका प्रशासनाने तत्काळ हटवावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळेयांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरातील सा. बां. इमारतीसमोर गेल्या अनेक दिवसांपासून एक अजस्त्र लोखंडी होर्डिंग उभे आहे. सध्या या होर्डिंगची अवस्था अत्यंत बिकट असून त्याला गंज चढला आहे. हे स्ट्रक्चर कमकुवत झाल्याने ते कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. मुंबईत घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती सावंतवाडीत होऊ नये, अशी भीती अजय गोंदावळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे. या जीर्ण होर्डिंगमुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या आणि वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. ‘जर हे धोकादायक होर्डिंग तत्काळ काढले गेले नाही, तर नागरिकांच्या जीवासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन आणि बांधकाम विभाग खडबडून जागे होणार का आणि हे मृत्यूचे सापळे हटवणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.