सावंतवाडी : गेल्या अनेक महिन्यांपासून सावंतवाडी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने शहराची सुरक्षा धोक्यात आली आहे. शहराचा ‘तिसरा डोळा’ बंद पडल्यामुळे चोरी आणि घरफोडीच्या घटनांचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. दुसरीकडे यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
गेल्या चार दिवसांत शहरात पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. सर्वोदय नगरमध्ये एका घरातून रोख रक्कम चोरीला गेली, तर लक्ष्मीनगर परिसरात एका वृद्ध महिलेचे दागिने हिसकावून घेण्यात आले. दोन्ही घटनांचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या अभावामुळे मोठ्या अडचणी येत आहेत. लक्ष्मीनगर येथील घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. सर्वोदय नगरमधील चोरटे कॅमेर्यात कैद झाले असले तरी, त्यांचे चेहरे झाकलेले असल्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले आहे.
आ. दीपक केसरकर यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी शहरात मुख्य ठिकाणी हे कॅमेरे बसवले होते. हे कॅमेरे थेट सावंतवाडी पोलिस ठाण्याला आणि सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाला जोडलेले आहेत. पण देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे यातील बहुतांश कॅमेरे बंद पडले आहेत. अनेकवेळा मागणी करूनही प्रशासन यावर कोणताही ठोस उपाय करत नाही. पोलिस सांगतात, संबंधित कंपनीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे कॅमेरे बंद आहेत, याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांच्या तपासावरही नकारात्मक परिणाम होत आहे. शहरावर लक्ष ठेवण्यासाठी बसवलेले कॅमेरे ऐनवेळी बंद असल्याने त्यांचा काहीच उपयोग होत नाही. यामुळे गुन्हेगारांवर अंकुश ठेवणे पोलिसांसाठी एक आव्हान आहे. स्थानिक नागरिकांनी हे बंद कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शहरात पुन्हा शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित होईल.