सावंतवाडी : गेली तीन महिन्यांपासून सावंतवाडी नगरपालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळालेला नाही, त्यामुळे शहरातील अनेक विकास कामे आणि प्रशासकीय कामकाज रखडले आहे. आगामी काळात पालिका निवडणुका जवळ आल्या असून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कायमस्वरुपी मुख्याधिकार्याची तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे.
मे महिन्याच्या अखेरीस तत्कालीन मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. तेव्हापासून कुडाळ येथील मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे. पावसाळा संपूनही आणि गणेशचतुर्थी होऊनही मुख्याधिकार्यांच्या नियुक्तीची केवळ चर्चाच सुरू आहे, प्रत्यक्षात मात्र काहीही झालेले नाही.
सावंतवाडी शहरात सध्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. परंतु, कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे या कामांवर परिणाम होत आहे. तसेच शहरातील स्वच्छतेची कामेही धीम्या गतीने सुरू आहेत. पूर्वी सावंतवाडी पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करण्यास अनेक अधिकारी उत्सुक असायचे, पण गेल्या दीड वर्षांपासून हे चित्र बदलले आहे.
स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत लवकरच सावंतवाडीला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटूनही अद्याप नियुक्ती झालेली नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळाल्यास शहरातील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या नगरविकास विभागाकडून काही प्रशासकीय बदल्या होणार असल्याची चर्चा आहे. या बदल्यांमध्ये तरी सावंतवाडीला कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळेल का, असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.