सावंतवाडी : राज्यभरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना, सावंतवाडी शहराला मात्र पाणीटंचाईची कोणतीही झळ बसणार नाही. मे महिन्यापर्यंत शहराला पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही खबरदारी म्हणून नागरिकांना दररोज एक वेळ आणि सव्वा तास नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली. शहरात अलीकडेच अतिक्रमण कारवाईमुळे विस्थापित स्टॉलधारकांना दिलासा देत, त्यांच्यासाठी 'खाऊगल्ली'च्या धर्तीवर जुन्या न्यायालयाच्या समोरील मोकळ्या जागेचा गांभीर्याने विचार सुरू असून आगामी १० नोव्हेंबरपूर्वी यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५७ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम युद्धपातळीवर
सावंतवाडी शहराच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेताना मुख्याधिकाऱ्यांनी म्हणाले, सद्यस्थितीत पालिकेकडे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी शहरात काटेकोर नियोजनासह सव्वा तास पाणीपुरवठा केला जाईल. आणीबाणीच्या प्रसंगी पाण्याचा वापर करता यावा यासाठी शहरातील खासगी व सार्वजनिक विहिरींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नवीन नळपाणी योजनेचे काम दर्जेदार आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. कामाच्या गुणवत्तेवर आणि गतीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष इंजिनिअर व सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे काम वेळेत पूर्ण करून सावंतवाडीकरांना अखंडित पाणीपुरवठा देण्याचा पालिकेचा मानस असून नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विस्थापित स्टॉलधारकांना मिळणार कायमस्वरूपी जागा
काही दिवसांपूर्वी पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि फुटपाथवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या स्टॉलवर पालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. या कारवाईमुळे स्टॉलधारकांमध्ये पसरलेली नाराजी आणि नगरसेवक तौकीर शेख यांनी सभागृहात मांडलेली भूमिका लक्षात घेऊन पालिकेने सकारात्मक पावले उचलली आहेत.