सतीश सावंत यांचा ठाकरे शिवसेनेला ‌‘जय महाराष्ट्र‌’  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Politics : सतीश सावंत यांचा ठाकरे शिवसेनेला ‌‘जय महाराष्ट्र‌’

विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा ; कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज निर्णय घेणार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे पाठवला आहे. शेती, सहकार विषयक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे. बुधवारपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेईन अशी माहिती सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपण जो काही निर्णय घेईन त्याबाबत मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्हयातील आपले कार्यकर्ते सोबत असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान बुधवारी कणकवलीत होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत सतीश सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

कणकवली येथे आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 2019 मध्ये आपण शिवसेना पक्षात प्रवेश केला तर 2022 पासून आपण ठाकरे शिवसेनेचा कणकवली विधानसभाप्रमुख म्हणून काम पाहत होतो. गेल्या 6 वर्षाच्या कालावधीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी खा. विनायक राऊत, माजी आ. वैभव नाईक, संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्यासह जिल्हयातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला चांगले सहकार्य केले, काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो. आपण जिल्हा बँकेचा अनेक वर्षे संचालक आणि चेअरमन होतो. सिंधुदुर्ग जि.प. अध्यक्ष म्हणूनही आपण काम केलेे.

शेतकऱ्यांचे शेतीविषयक प्रश्न, सहकार विषयक प्रश्न, फळपिक विमा, शेती नुकसान भरपाई याबाबत गेल्या दीड, दोन वर्षात आपण शेतकऱ्यांना न्याय देवू शकलो नाही. त्यामुळे जिल्हयातील लोकांची मागणी होती की, सहकार, शेती क्षेत्राशी निगडीत शासनस्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सत्तेच्या प्रवाहात राहिले पाहिजे. जिल्हयातील अनेक बुजुर्ग लोकांनी दूरध्वनीवर संपर्क साधून तसेच प्रत्यक्ष भेटून याबाबत आपल्याला विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देवून आपण विधानसभाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. भविष्यातील वाटचालीबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलून शेतकरी, सहकार क्षेत्रबाबतचे प्रश्न जिथे सुटतील तिथे जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आपले सहकारी मंगेश सावंत यांनाही आपण सकाळी आपला निर्णय सांगितला. त्यावेळी त्यांनीही तुम्ही ठाकरे शिवसेनेचा राजीनामा देणार असाल तर आपणही जि.प. निवडणूक लढवणार नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनाही आपण धन्यवाद देतो.

गेल्या काही दिवसात कणकवली तालुक्यात उबाठाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले याकडे लक्ष वेधले असता सतीश सावंत म्हणाले, ठाकरे शिवसेना सत्तेत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची लढण्याची मानसिकता नाही. गेल्या काही दिवसातील परिस्थिती पाहिली तर कार्यकर्तेच लढण्याच्या मानसिकतेत नसतील तर आपण हे प्रश्न सोडवणार कसे? त्यामुळे सत्तेच्या प्रवाहात जावून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा आपण निर्णय घेतला आहेे. ठाकरे शिवसेनेतील गटबाजीबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला तरी कुठलीही गटबाजी दिसली नाही. आपणही कुठल्याही गटात सामील नव्हतो. पक्षात असताना प्रामाणिक काम केले. सत्तेतील भाजप किंवा शिवसेना कोणत्या पक्षात आपण जाणार?असा प्रश्न केला असता जो पहिला संपर्क करेल त्याच्या शब्दाला मान देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक हा विषय आपल्यासाठी संपला असून शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे हेच आपल्यासाठी महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT