Kudal crime | वाळूमाफियांची मुजोरी: कुडाळात महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न; बनावट नंबर प्लेटचा वापर Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Kudal crime | वाळूमाफियांची मुजोरी: कुडाळात महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न; बनावट नंबर प्लेटचा वापर

चालकाच्या प्रसंगावधानाने तीन तलाठी थोडक्यात बचावले; दोन डंपरचालक पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ: कुडाळ तालुक्यात अनधिकृत वाळू वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल पथकालाच जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना एका मुजोर डंपरचालकाने तीन तलाठी बसलेल्या कारवर डंपर चढवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना नेरूर ते कुडाळ एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि.9) दुपारी घडली. कारचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आणि तिन्ही तलाठी थोडक्यात बचावले.

कुडाळ महसूल विभागाने चेंदवण आणि कवठी परिसरात अनधिकृत वाळू उपशासाठी तयार केलेले आठ रॅम्प उद्ध्वस्त करण्याची कारवाई केली होती. ही कारवाई आटोपून तीन तलाठी कारने कुडाळकडे परतत असताना त्यांना नेरूर नाका येथे वाळूने भरलेले दोन डंपर दिसले. पथकाने इशारा करताच एक डंपर थांबला, मात्र दुसऱ्याने वेगाने पळ काढला.

महसूल पथकाने या डंपरचा पाठलाग सुरू केला. एमआयडीसी परिसरात पथकाने डंपरला ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त डंपरचालकाने आपला डंपर थेट कारच्या अंगावर घातला. कारचालकाने वेळीच गाडी बाजूला घेतल्याने डंपर कारच्या मागील चाकावर धडकला. यानंतरही न थांबता चालकाने डंपरमधील वाळू रस्त्यात ओतून पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र महसूल पथकाने त्याला अखेर पकडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही डंपर आणि चालकांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार वीरसिंग वासावे यांनी दिली. या घटनेमुळे वाळूमाफियांची वाढलेली मुजोरी आणि कायदा हातात घेण्याची त्यांची प्रवृत्ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

डंपरची नंबर प्लेटही बनावट

महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपरच्या पुढील आणि मागील नंबर प्लेट वेगवेगळ्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे हा डंपर बनावट नंबर प्लेट वापरून अवैध वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस या दिशेनेही अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT