sagar Kariwadekar Arrest- 
सिंधुदुर्ग

Pune youth attack Mastermind Sagar Kariwadekar Arrest-पुण्यातील तरुणावर हल्ला, मुख्य सूत्रधार सागर कारिवडेकर अटकेत

Mastermind Sagar Kariwadekar Arrested-पुण्यातील तरुणावर जीवघेणा हल्ला, मुख्य सूत्रधार सागर कारिवडेकर अखेर गजाआड, तीन दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी :ऑक्टोबर २०२५ मध्ये सावंतवाडी-सर्वोदयनगर येथे पुण्याच्या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधार सागर सुबोध कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गेले सहा महिने पोलिसांना चकवा देणाऱ्या कारिवडेकरला रविवारी रात्री कारिवडे गावातून सापळा रचून अटक करण्यात आली.

सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २९ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ६ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री सर्वोदयनगर परिसरात पुणे येथील तरुण आणि स्थानिक तरुणांमध्ये जोरदार राडा झाला होता. याप्रकरणी शौनक सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून सागर कारिवडेकर आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध मारहाण व गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील तहा राजगुरू, तला राजगुरू आणि नितीन मेस्त्री या साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र मुख्य आरोपी सागर कारिवडेकर तेव्हापासून फरार होता. सापळा रचून केली कारवाई सागर कारिवडेकर आपल्या सासुरवाडीला (कारिवडे) येणार असल्याची गुप्त माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार महेश जाधव आणि महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला रात्री ८ वा.च्या सुमारास ताब्यात घेतले. सागर कारिवडेकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, सावंतवाडीसह ठाणे आणि मुंबई येथेही त्याच्यावर आर्थिक व्यवहारासंबंधी अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुंतवणूकदारांवर साथीदारांच्या मदतीने हल्ले करणे, मारामारी करणे अशा गुन्ह्यांतही त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही त्याच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस कोठडीदरम्यान खुनाच्या प्रयत्न प्रकरणातील विविध पैलूंचा उलगडा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या अटकेमुळे तपासाला मोठी गती मिळाली असून, पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर ठाणे पोलिस कारिवडेकरवर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे आणि जयेश खंदरकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT