मालवण : आ. सदाभाऊ खोत यांचे स्वागत करताना संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर व इतर.  
सिंधुदुर्ग

Sadabhau Khot : आंबा बागायतदारांना प्रति हेक्टरी २ लाखांपर्यंत नुकसानभरपाई मिळायलाच हवी

आ. सदाभाऊ खोत : राज्य सरकारने याची दक्षता घ्यावी

पुढारी वृत्तसेवा

मालवण : कोकणची ओळख दाखविणारा ‘हापूस’ हा वातावरणातील बदलामुळे यंदाच्या हंगामात अडचणीत आला. ‘हापूस’ आंब्याचा मोहोर घळून गेल्याने आंबा बागायतदार व उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासनाने आंबा बागायतदारांना दिलेली हेक्टरी २२ हजार रुपये व नगाला २२० रुपये अशी नुकसानभरपाई ही चुकीची असून आंबा बागायतदारांना २ लाखांपर्यंत नुकसानभरपाई मिळेल व त्याचा लाभ सर्व आंबा बागायतदारांना मिळेल, याची दक्षता सरकारला घ्यावी लागेल, असे परखड मत माजी कृषी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.

आ. सदाभाऊ खोत हे मालवण भेटीवर आले असता त्यांनी मालवणमधील मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे यांच्या वायरी येथील निवासस्थानी सपत्नीक सदिच्छा भेट दिली. संतोष लुडबे यांनी त्यांचे स्वागत केले. आ. खोत यांनी यांनी स्थानिक आंबा बागायतदार व आंबा व्यावसायिकांशी घटलेल्या आंबा उत्पादनाविषयी संवाद साधत आंबा बागायतदारांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करू, असे आश्वासन दिले.

यानंतर मालवण शासकीय विश्रामगृह येथे आ. सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मातृत्व आधार फाऊंडेशनचे दादा वेंगुर्लेकर, जगदीश तोडणकर, श्री. गावकर, दीक्षा गावकर, माजी नगरसेवक यतीन खोत आदी उपस्थित होते. आ. खोत म्हणाले, आंब्याच्या एका झाडावर मागे किती उत्पन्‍न मिळते त्याच्या किमान ५० टक्के नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, मात्र शासनाने हेक्टरी २२ हजार रुपये व नगाला २२० रुपये अशी नुकसानभरपाई दिली हे चुकीचे आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आंबा बागायतदारांच्या प्रश्नासाठी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा त्यांची धरपकड केली गेली, त्याबाबतही मी सरकारला फटकारले होते. आंबा शेतकरी हे चालत आले होते, ते कोणतेही हत्यार घेऊन आले नव्हते. सरकार हे मायबाप आहे, मग लेकरांनी मायबापाकडे नाही जायचे तर कुठे जायचे? ते सरकारनेच सांगावे. असे सांगून ते म्हणाले, लोक तुमच्या पदामुळे तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी येत असतात, पद नसेल तेव्हा तुमचे कोणी नावही घेणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी सांगत सरकारला कानपिचक्या दिल्या. आंबा बागायतदारांच्या नुकसानप्रकरणी सरकारने प्रथम आंबा बागायतदार उत्पादकांशी संवाद साधला पाहिजे, त्यांची व्यथा जाणून घेतली पाहिजे व त्यातून त्यांच्या न्यायासाठी मार्ग काढावा, असे आवाहन आ. सदाभाऊ खोत यांनी केले.

आ. सदाभाऊ खोत म्हणाले, मालवणचे पर्यटन हे केवळ मालवणी जेवण आणि तळलेला मासा यापुरतेच मर्यादित राहता कामा नये. येणारा पर्यटक हा अनेक अपेक्षानी एखाद्या पर्यटनस्थळी येत असतो. त्यांना हवी असणारी सुरक्षितता, विविधता आणि सोयी सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. केरळच्या पर्यटनाची एक सिस्टीम तयार झालेली आहे, मात्र मालवणमध्ये तशी सिस्टीम दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करताना सदाभाऊ खोत म्हणाले, येथील स्वच्छतेवर लक्ष दिले गेले पाहिजे, किनारपट्टीवरील घरे, हॉटेल्स सुशोभीत करून तेथे खाद्यपदार्थांचे एक मॅनेजमेन्ट तयार केले पाहिजे. किनारपट्टी हीच एक मोठी बाजारपेठ म्हणून विकसित केली पाहिजे. मालवण विशेषतः सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळख जातो, अशावेळी परराज्यातील पर्यटक मालवणमध्ये किती येतात यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. या भागात केवळ राज्यातील नव्हे तर देशी विदेशी पर्यटक कसे येतील त्यादृष्टीने शासनाने पावले उचलली पाहिजे, आलेले पर्यटकांना वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते अशावेळी काय करता येईल, पर्यायी उपाययोजना करताना बाजारपेठ कशी विकसित होईल, याभागातील लोकांचा आर्थिकदृष्ट्या कसा विकास साधला जाईल, याचा इथल्या लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT