ओरोस : ग्राम विकास व जल संधारण विभागाकडील शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्मार्ट ग्राम योजनेची अंमल बजावणी करण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये योजनेच्या अंमल बजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. प्रती तालुका सुंदर गांव ग्रामपंचायतींना 10 लक्ष व जिल्हा सुंदर गांव ग्रामपंचायतींना 40 लक्ष पारितोषिकाची रक्कम वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) यांनी दिली आहे.
स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारीक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या निकषांची पुर्तता करीत असलेल्या सन 2023-24 अंतर्गत निवड झालेल्या आर.आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे:- तालुका कुडाळ मधुन निरुखे ग्रामपंचायत, ता. मालवण मधुन वराड ग्रामपंचायत, ता. देवगड मधुन बापर्डे ग्रामपंचायत, ता. वेंगुर्ला मधुन पालकरवाडी ग्रामपंचायत व परबवाडा ग्रामपंचायत (विभागुन), ता. दोडामार्ग मधुन मणेरी ग्रामपंचायत, ता. कणकवलीमधून तरंदळे ग्रामपंचायत, ता. वैभववाडी मधुन उपळे ग्रामपंचायत, ता. सावंतवाडीमधून वेत्ये ग्रामपंचायत व आरोंदा ग्रामपंचायत (विभागून) तसेच तुळसुली कर्याद नारुर ता. कुडाळ या ग्रामपंचायतीची तालुका स्पर्धेत सन 2021-22 मध्ये आर. आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव म्हणुन निवड करण्यात आली होती.
त्यामुळे ग्रामपंचायत सन 2023-24 च्या तालुका सुंदर गाव स्पर्धेसाठी पात्र ठरली नाही, मात्र शासन निर्णयातील तरतुदिप्रमाणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरते. या सर्व ग्रामपंचायतींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने तपासणी केली. त्यामधुन जिल्हा सुंदर गाव स्पर्धेत जास्त गुणांकन मिळवून तुळसुली कर्याद नारुर ता. कुडाळ ही ग्रामपंचायत सन 2023-24 साठी आर.आर (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी घोषित केले तसेच तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव म्हणुन निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.
स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत आर. आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव व आर आर (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव म्हणून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचयातींना पारीतोषिक प्राप्त रकमेतून खालील नाविन्यपुर्ण कामे करण्याबाबत परवानगी देण्यात आलेली आहे. अपारंपारीक उर्जा संबधी अभिनव प्रकल्प,स्वच्छतेबाबत अभिनव प्रकल्प, महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकुल प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली बसविणे (ॠखड), आंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्वे, संकलन आणि तपासणीसूची तयार करुन दर्जा वाढवण्यासाठी (खडज) प्रकल्प राबवणे.
कुडाळ: निरुखे, मालवण: वराड, देवगड: बापर्डे, वेंगुर्ला: पालकरवाडी व परबवाडा (विभागून), दोडामार्ग: मणेरी, कणकवली: तरंदळे, वैभववाडी: उपळे, सावंतवाडी: वेत्ये व आरोंदा (विभागून).