कुडाळ : कुडाळ शहरातील हॉटेल अभिमन्यू ते नवीन एसटी डेपो रस्त्यापाठोपाठ पोलिस ठाणे ते कॉलेज चौक रस्त्याचेही डांबर उन्हामुळे वर आले. त्यामुळे सोमवारी दुचाकीधारकांना कसरत करावी लागली तर पादचार्यांना रस्त्याने चालणेही मुश्किल बनले. अलिकडेच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांतच नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे डांबर भर उन्हात विरघळून रस्त्याच्या वर आल्याने, डांबराचा सुमार दर्जा उघड झाला आहे. एकूणच या रस्त्याच्या डांबण्यात ऑईल मिक्स केलंय की काय? संशय व्यक्त केला जात आहे.
कुडाळ शहरातील हॉटेल अभिमन्यू ते काळपनाका नवीन एसटी डेपो या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अलिकडेच करण्यात आले. सोमवारी या रस्त्यावर डांबर वितळून रस्त्याच्या वर आले. त्यामुळे पोस्ट ऑफीस ते पोलीस स्टेशन चौक आणि भैरववाडी ते काळपनाका या दरम्यान रस्ता पूर्णतः चिकट बनला होता. या रस्त्याने दुचाकी चालवणे जिकीरीचे झाले तर पादचार्यांना चालणेही अवघड झाले.
त्यापाठोपाठ सोमवारी दुपारी पोलिस स्टेशन ते कॉलेज चौक दरम्यान रस्त्यावरील डांबर विरघळून रस्त्यावर आले. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. सायंकाळपर्यंत रस्त्याच्या वर विरघळलेले डांबर जैसे थे होते. नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे डांबर उन्हात विरघळून रस्ता चिकट बनल्याने या रस्ता कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून संशय व्यक्त केला जात आहे. अल्पावधीतच डांबर विरघळल्याने डांबरीकरणाच्या कामात वापरलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.