मडुरा : अवकाळी पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकर्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. विशेषतः नाचणी आणि भात शेतीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. रोणापाल गावातील शेतकर्यांच्या नाचणी पिकालाही कोंब फुटल्याने पूर्ण उत्पादन हुकले आहे. इपीक नोंद शिथिल करून सरकारने कोणतेही निकष न लावता सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केली आहे.
श्री.गावडे यांनी सांगितले की, अनेक शेतकर्यांनी स्वतःच्या जमिनीव्यतिरिक्त इतरांच्या जमिनीतही भात आणि नाचणी शेती केली आहे. मात्र अशा शेतकर्यांची जमीन नोंद त्यांच्या नावावर नसल्याने इपीक पाहणी नोंदणीच्या नियमांमुळे त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे सरकारने ईपीक पाहणी नोंद शिथिल करून प्रत्यक्ष शेती करणार्या शेतकर्यांना मदत द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
अवकाळी पावसामुळे मडुरा, रोणापाल, पाडलोस, कास, सातोसे आणि निगुडे आसपासच्या भागात पिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे. शेतकर्यांनी सांगितले की, या पावसाने भाताच्या कणसाला बुरशी लागली असून, नाचणी पिकालाही अंकुर फुटले आहेत. यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असून, शेतकर्यांच्या हातात काहीच राहिलेले नाही.
रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्याने शेतकर्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी, पुढील काही दिवसांत हवामान पुन्हा खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सरकारने तातडीने पंचनामे करून निकष न लावता सर्व पीडित शेतकर्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मडुरा परिसरातील शेतकर्यांकडून केली जात आहे.