पर्यटकांच्या विक्रमी गर्दीने आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामाची सांगता 
सिंधुदुर्ग

Amboli Waterfall : पर्यटकांच्या विक्रमी गर्दीने आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामाची सांगता

शनिवारी, रविवारी आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

आंबोली : हजारो पर्यटकांच्या गर्दीने आंबोली वर्षा पर्यटन हंगामाची रविवारी सांगता झाली. गुरुवार, १३ ऑगस्टपासून श्रावण मासाला प्रारंभ होत असल्याने वीकेंडचा हा अंतिम रविवार होता. सहाजिकच शनिवारी व रविवारी आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. आंबोली धबधबा, कावळेसाद पॉईंट, महादेवगड पॉईंट, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, बाबा धबधबा आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. परिणामी, आंबोली घाटमार्गासह सर्वच पर्यटन स्थळांवर वारंवार वाहतूक कोंडी दिसून आली.

दरवर्षी मान्सूनच्या आगमनानंतर आंबोली घाटातील मुख्य धबधबा प्रवाहीत झाल्यानंतर आंबोली वर्षा पर्यटन हंगामाला सुरुवात होते. त्यानंतर श्रावण मास आरंभापर्यंत आंबोली वर्षा पर्यटन हंगाम चालतो. यंदा मान्सूच्या आगमनानंतर पावसाने सुमारे २० ते २२ दिवस विश्रांती घेतल्याने आंबोली वर्षा पर्यटनाचा हंगाम हा फक्त दीड महिन्याचा ठरला. या काळात देशभरातील लाखो पर्यटकांनी आंबोली वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आंनद घेतला. दरम्यान, आंबोली वर्षा पर्यटन हंगामाचा अंतिम ‘वीकेंड’ पूर्णतः हाऊसफुल्ल होता. यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी शुक्रवारपासूनच हजारो पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे परिसरातील सर्व हॉटेल्स आणि होम स्टे हे आगाऊ बुकिंगने 'हाऊसफुल्ल' होते.

शनिवारी पूर्व आरक्षणाविना आंबोलीत आलेल्या अनेक पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. त्यांना साधी रूम मिळणेही कठीण झाल्याने, निदान एक रात्र निवाऱ्यासाठी मिळावी म्हणून ते स्थानिकांच्या घरात आसरा शोधत असल्याचे चित्र होते. रविवारी पर्यटन हंगामाचा शेवटचा दिवस होता. आंबोलीत रविवारी लाखांवर पर्यटकांनी गर्दी केली. पर्यटकांच्या या अलोट गर्दीमुळे घाटमार्गासह आंबोली पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या सर्वच मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT