दीपक केसरकर 
सिंधुदुर्ग

Shaktipeeth Expressway : ‘शक्‍तिपीठ’चा सिंधुदुर्गात फेर सर्व्हे करण्याचे आदेश!

आ. दीपक केसरकर यांची माहिती : महामार्ग रेडी बंदर, मुंबई- गोवा महामार्ग व कोकण एक्सप्रेसला जोडण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : ‘शक्तिपीठ’ महामार्ग थेट गोव्याबरोबरच कोकणातील रेडी बंदर, मुंबई- गोवा महामार्ग, कोकण एक्सप्रेससह प्रमुख महामार्गांना जोडला जावा. त्या दृष्टीने पुन्हा पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिले आहेत. हा महामार्ग जोडल्यास कोकण विकासाला आणि येथील स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल, अशी माहिती आ.दीपक केसरकर यांनी दिली.

आ. केसरकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. ते म्हणाले, मतदार संघातील प्रमुख प्रश्नाबाबत मुंबईत बैठक झाली. ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या प्रस्तावीत आरखड्यानुसार या महामार्गाचा विशेषतः वेंगुर्ले बंदराच्या विकासाला अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे हा महामार्ग मळगाव येथून रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडला जावा, अशी मागणी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत केली आहे. त्यांनी ती मान्य केली असून या मागणीबाबत लवकरच पुन्हा पाहणी करून सकारात्मक सर्वेक्षण होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

कोकणातील पायाभूत सुविधांचा विकास करताना स्थानिक व्यापार आणि बंदरांचा वापर वाढणे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्ग जर थेट गोव्यात गेला, तर स्थानिक अर्थकारणाला त्याचा फारसा लाभ मिळणार नाही.हा महामार्ग मळगाव येथून जोडणी मिळाल्यास रेडी बंदराच्या मालवाहतुकीला आणि विकासाला मोठी गती मिळेल. या कनेक्टिव्हिटीमुळे वेंगुर्ला बंदराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. या मार्गाद्वारे चौकुळ हा उंचावरील शेवटचा गाव देखील कनेक्ट केला जाणार आहे. तेथून तो दोडामार्ग तालुक्याला जोडला जावा तर पुढे तेरवण मेढे व मोर्ले पारगड ते कोनाळकट्टा व मुख्य रस्ता मिळतो त्या दोन पैकी एक मुख्य रस्ता द्वारे हा महामार्ग गोव्याला कनेक्ट होईल. त्यांनतर चंदगड गोवा मळगांव मार्गे दुसऱ्या कोकणातील रस्त्यांशी जोडेल असे आ. केसरकर यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्गाला बांदा येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ बागायती प्रभावित होईल, परिणामी त्यात बदल करण्यात आला असून बागायतीचा प्रदेश भाग टाळता येईल याकरिता प्रयत्न असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले.

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भातील आदेश दिले असल्याची माहिती आ.केसरकर यांनी दिली. सावंतवाडी ​विधानसभा मतदारसंघातील पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. इन्सुली ते आडाळी एमआयडीसीपर्यंत स्वतंत्र वीज वाहिनी टाकून दोडामार्ग तालुका व आडाळी एमआयडीसी भागातील वीज वितरण व्यवस्था बळकट केली जात आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये ४९ नवे उद्योग येणार असल्याने वीज कंपनीकडून वाहिन्या टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. या कामात कोणतीही अडचण किंवा विरोध आल्यास संबंधितांशी संवाद साधून तो सोडवला जाईल; मात्र गरज भासल्यास पोलिस बंदोबस्तात काम पूर्ण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT