तिलारीच्या खोऱ्यात 'वनमानवा'चे दर्शन  
सिंधुदुर्ग

Slender Loris : तिलारीच्या खोऱ्यात 'वनमानवा'चे दर्शन

दुर्मीळ 'स्लेंडर लॉरिस' कॅमेऱ्यात कैद

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : कोकणच्या जैवविविधतेचा अनमोल ठेवा असलेल्या तिलारी खोऱ्यात एका अत्यंत दुर्मिळ वन्यजीवाचे दर्शन झाले आहे. ‘स्लेंडर लॉरिस’ (Slender Loris), ज्याला स्थानिक भाषेत ‘वनमानव’ किंवा ‘लाजवंती’ म्हणून ओळखले जाते, तो प्राणी अभ्यासकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या दुर्मिळ दर्शनामुळे वन्यजीव प्रेमी आणि पर्यावरणवाद्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सह्याद्रीच्या जंगलांचे आरोग्य उत्तम असल्याचे हे लक्षण आहे.

नेमकी घटना काय?

सह्याद्रीच्या घनदाट जंगलात काही प्राणी अभ्यासक वन्यजीवांचा अभ्यास करत असताना, त्यांना झाडांच्या फांद्यांमध्ये एका लहान, मानवी आकृतीशी साधर्म्य असलेल्या प्राण्याचे दर्शन झाले. मोठे गोलाकार डोळे आणि सडपातळ शरीरयष्टी असलेल्या या प्राण्याला पाहिल्यावर सुरुवातीला एखादे ‘लहान बाळ’ बसले आहे असा भास होतो. मात्र, निरीक्षणाअंती तो दुर्मिळ ‘स्लेंडर लॉरिस’ असल्याचे स्पष्ट झाले. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात हा वावर आढळून आला आहे.

काय आहे 'वनमानवा'चे महत्त्व?

लाजाळू स्वभाव: मानवी चाहूल लागताच पानापाड्यात लपून बसण्याच्या सवयीमुळे याला ‘लाजवंती’ म्हटले जाते. हा प्राणी प्रामुख्याने घनदाट जंगलात आणि अति पावसाच्या प्रदेशात आढळतो. पश्चिम घाटातील सह्याद्री पट्टा यासाठी पोषक मानला जातो. स्लेंडर लॉरिस हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार याचा समावेश ‘शेड्यूल वन’ (Schedule I) मध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच, या प्राण्याला वाघ किंवा बिबट्याप्रमाणेच सर्वोच्च दर्जाचे कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे.

महिन्यापूर्वी सापडला होता 'स्लेंडर लॉरिस' चा मृतदेह

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात बांबर्डे परिसरात एक महिन्यापूर्वी एक 'स्लेंडर लॉरिस' वीजेचा शाॅक लागून मृत झाल्याचे आढळून आले होते. त्याचे वय एक वर्ष असेल असे सहा.वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी सांगितले. तिलारी परिसरात 'स्लेंडर लॉरिस’चे अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. पर्यटकांनी किंवा स्थानिकांनी अशा दुर्मिळ प्राण्यांना त्रास देऊ नये आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT