दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे दुर्मिळ असलेला उडता सोनसर्प आढळून आला आहे. या गावात पुन्हा एकदा सोनसर्प आढळून आल्याने सर्प मित्रांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. (Ornate Flying Snake)
घोटगेवाडी येथील शेतकरी सखाराम नारायण सुतार यांच्या घरालगत शुक्रवारी सायंकाळी हा साप दिसून आला. नेहमी आढळणाऱ्या प्रजाती व्यतिरिक्त नवीन प्रजातीचा साप असल्याचे दिसून आले. या सापाला सर्पमित्र लाडू गवस यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. अशा प्रकारचा साप गतवर्षी जूनमध्ये येथील दत्त मंदिराच्या परिसरातील पिंपळाच्या झाडाखाली आढळून आला होता.
या सापाला शेलाटी तथा उडता सोनसर्प तथा इंग्रजीत ऑरनेट फ्लाईंग स्नेक (शास्त्रीय नाव : क्रिसोपेलिया ओर्नाटा) म्हणतात. हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. सहसा झाडांतून राहणारा हा सर्प फांद्यांतून लांब उड्डाणावजा उड्या मारू शकतो. माणसाला हानिकारक होईल इतका विषारी समजला जात नाही. हिरवट पिवळा ज्यावर काळे पट्टे आणि सुंदर नक्षी असलेला हा साप महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि आंबोली घाटात काही प्रमाणात आढळून येतो. या सापाची लांबी ही सुमारे २.५ ते ४ फूट असून तो निमविषारी प्रवर्गातील असल्याचे जाणकारांचे मत आहे.