सिंधुदुर्ग

Sindhudurg News : कुडाळात राणे परिवाराचा जल्लोष

आ. नीलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त दर्शवली कुटुंबाची एकजूट

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : सिंधुदुर्गात राणे परिवाराचा दबदबा पुन्हा एकदा दिसून आला. आ. नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळा फक्त उत्सव नव्हे, तर राजकीय ताकद आणि मतदारसंघातील प्रभूत्वाची घोषणा ठरली. खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांसह उपस्थित बंधू-बांधवांनी आगामी काळात सिंधुदुर्ग विकासासाठी आणि राजकीय धोरणांसाठी आपण किती ठाम आहोत, याचे प्रदर्शन केले. राणेंच्या या एकजुटीच्या कार्यक्रमातून सिंधुदुर्गात आमचा दबदबा अजून मजबूत आहे, आमच्या मार्गात अडथळा उभा राहू शकत नाही, असा विरोधकांसाठी स्पष्ट संदेश दिला.

कुडाळ मतदारसंघाचे आ. नीलेश राणे यांच्या वाढदिवसानितिमित्त कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानात अभिष्टचिंतन सोहळा मंगळवारी रात्री उशिरा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. कार्यक्रमासाठी खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी विशेष भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते.

नियोजित वेळेपेक्षा सुमारे दीड तास उशिराने आ. नीलेश राणे कुटुंबियांसह कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांच्या आगमनावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि समर्थकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. व्यासपीठावर आल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आई-वडील, भाऊ आणि सहकाऱ्यांनी त्यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या.

काहीजणांकडून राणे परिवारात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न!

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, आ. नीलेश राणे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आणि कारभार पाहता त्यांनी ठरवलेले प्रत्येक ध्येय गाठायची क्षमता त्यांच्यात आहे. कुडाळ मतदारसंघ सध्या खऱ्या अर्थाने 'सुवर्णकाळा'त प्रवेश करत असून, या काळात विकासाची गती अधिक वेगवान होणार आहे. भाऊ म्हणून नीलेश राणेंचा अभिमान वाटतो. दरम्यान, काहीजण जाणूनबुजून राणे परिवारात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी इशारा दिला. गेल्या काही महिन्यांत असे प्रकार समोर आले असून, ही मंडळी कोण आहेत हेही आम्हाला माहिती आहे. आमच्यात भांडण लावून स्वतःचे राजकारण करणाऱ्यांनी सावध राहावे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत बोलताना त्यांनी, ते मनाने चांगले आहेत; मात्र काहीजण आमच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार वेळेत थांबले पाहिजेत, असे स्पष्ट केले.

माझ्या दोन्ही मुलांना आशीर्वाद द्या : खा. नारायण राणे

खा. नारायण राणे यांनी भावनिक भाषण करत कुटुंबाच्या कार्याचा आढावा घेतला. मला आयुष्यात सर्व काही मिळाले आहे. हा सन्मान माझा नसून सिंधुदुर्गातील जनतेचा आहे, असे सांगत त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या, आमचे कुटुंब देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही. सिंधुदुर्गातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी आणि आनंदी राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजारी असूनही जनतेला भेटण्यासाठी आल्याचे सांगत मी तुमच्याकडे काहीच मागत नाही तुमच्याकडे स्वाधीन केलेल्या नीलेश, नितेश या दोन्ही मुलांना आशीर्वाद द्यावेत एवढेच याप्रसंगी मी मागत आहे, असे खा. नारायण राणे यांनी सांगितले.

आमचे नाते समजून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील!

आ. नीलेश राणे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विकासाचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला. मागील दीड वर्षांत मतदारसंघासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. पुढील चार वर्षांत कुडाळ मतदारसंघाला राज्यात अग्रस्थानी नेणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त त्यांनी राणे बंधूंच्या नात्याबाबत बोलताना, आमचे नाते समजून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील, असे सांगत एकजुटीचा संदेश दिला. मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझी बोलण्याची शैली आक्रमक असली तरी उद्देश फक्त विकास हाच आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT