Raju Shetty vs Narayan Rane Shaktipith Highway
सिंधुदुर्ग : इटलीवरून प्राडाला कोल्हापुरात यावे लागले. हीच कोल्हापूरची ताकद आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे शक्तिपीठाची कळ काढू नका, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी आज (दि.१६) बोलत होते. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार, या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावर जर बारा जिल्ह्याचे कल्याण होणार असेल, तर त्यांचे फटके खायला मी तयार आहे, असे आव्हान शेट्टी यांनी यावेळी दिले.
नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्ग अनावश्यक व महाराष्ट्रातील जनतेवर बोजा वाढवणारा आहे. कोकणातील जंगल तोडून पर्यावरणाचा -हास करून इथल्या भूमिपुत्रांवर अन्याय करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध राहील, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कोल्हापूरमध्ये शक्तिपीठाच्या समर्थनार्थ काढलेला मोर्चा हा मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी व त्यांच्या मर्जीत जाण्यासाठी हा मोर्चा काढलेला होता, अशी टीका चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचे नाव न घेता केली. ज्यांनी मोर्चा काढला ते बाधित यादीमध्ये आहेत का? हे त्यांनी सांगावे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे, म्हणून आमचा विरोध आहे. महाराष्ट्राच अर्थ कारण हे उसावर अवलंबून आहे. २० टक्के उसाच्या उत्पादनात या महामार्गामुळे घट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारणावरच त्याचा थेट परिणाम होणार आहे.
इथल्या आमदार खासदारांनी ताकद लावून मुंबई - गोवा महामार्ग पूर्ण करावा. आंबा काजू, फणस यावर प्रक्रिया करणारे उद्योग पर्यावरण पूरक उद्योग येथे आणावेत, याला आमचा विरोध नाही. मात्र, सगळ्या जगाचे आकर्षण असलेल्या कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्याला स्वत:च्या स्वार्थासाठी गालबोट लावू नका. या महामार्गासाठी ८६ हजार कोटी रूपये खर्च होणार म्हणतात. मात्र, पूर्वीचा अनुभव पाहता समृद्धी महामार्गाचा डीपीआर वाढत गेला तरी अजूनही तो पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा खर्च दीड लाख कोटी पर्यंत जाईल. हा सारा पैसा टोलच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या जनतेला भरावा लागणार आहे.
मी अत्यंत जबाबदारीने सांगतो गडचिरोलीमध्ये अडीच हजार एकर जमिनीवर जंगल होते. तिथल्या आदिवासींना पोलिसांच्या करवी हुसकावून लावण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणले. म्हणजे आदीवासींना नक्षली ठरवता येईल. सामाजिक चळवळी संपवता येईल. याचा घाट घातला जातोय. यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेच्या आड कोणी येऊ नये, यासाठी सामाजिक चळवळीला नक्षली ठरवायचे आणि आपला स्वार्थ साधायचे प्रयत्न सुरू आहेत, हे आम्ही होऊ देणार नाही.