Raju Shetti  File Photo
सिंधुदुर्ग

Raju Shetti : आंबा, काजू बागायतदारांचा लवकरच मुंबईत मोर्चा

शेतकरी नेते राजू शेट्टी : राज्य शासनावर टिकास्त्र

पुढारी वृत्तसेवा

कणकवली ः नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या कोकणातील आंबा, काजू उत्पादकांची शासनाने तुटपुंजी नुकसान भरपाई जाहिर करुन फसवणूक केली आहे. हेक्टरी 22 हजार भरपाई म्हणजे कलमाला केवळ 220 रुपये मदत जाहिर करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता कोकणातील शेतकरी बागायतदारांना आरपारची लढाई लढावी लागणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी बागायतदारांना घेवून लवकरच मुंबईत भव्य मोर्चा काढणार असल्याचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बुधवारी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात आंबा, काजू पिकाला नुकसान भरपाई जाहिर केल्यानंतर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोकणातील शेतकरी बागायतदार गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनाकडे भरीव नुकसान भरपाईसाठी आंदोलने करत आहेत. राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत अलिकडेच काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग रोखला होता. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाकडून जाहिर झालेल्या नुकसान भरपाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कुंभमेळ्यासाठी 25 हजार कोटी शासनाकडे आहेत. 2015 चा कुंभमेळा अडीज हजार कोटीत झाला होता. शक्तीपीठ महामार्गासाठी 15 हजार कोटी रुपये उधळायला सरकारकडे आहेत. परंतु ज्या कोकणातील शेतकऱ्यांनी केवळ आंब्याच्या उत्पादनातून सुमारे 1300 कोटी रुपये परकीय चलन शासनाला मिळवून दिले तो शेतकरी पहिल्यांदाच शासनाकडून मदतीची अपेक्षा करत होता परंतु त्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले आहे. ज्या कलमावर शेतकऱ्याने साडेचार ते पाच हजार रुपये खर्च केले आहेत त्याला केवळ 220 रुपये मिळणार आहेत. बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना याची किंमत मोजावी लागणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा लवकरच मुंबईत धडकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT